पांडे गावात स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना दप्तर वाटप.
मंगेश पवार
सारोळे : स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि देशभक्तीची भावना यावर्षी पांडे गावात शिक्षणाच्या प्रोत्साहनासोबत साजरी करण्यात आली. १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पांडे येथील अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत पांडे यांच्या वतीने दप्तर वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवर, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच तेजस साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता.
दप्तर वाटप करताना सरपंच तेजस साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. “विद्यार्थी हे गावाच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. शिक्षणात कोणीही मागे राहू नये म्हणून ग्रामपंचायतीने हा उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या गावातील प्रत्येक मुलगा-मुलगी सुशिक्षित व्हावी, हीच आमची खरी देशभक्ती आहे,” असे ते म्हणाले.
दप्तर मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पालकांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. “अशा उपक्रमामुळे मुलांमध्ये शाळेबद्दल अधिक उत्साह निर्माण होतो,” असे एका पालकाने सांगितले.
ग्रामपंचायत सदस्यांनीही शिक्षणविषयक विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प या प्रसंगी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षकांनी केले, तर आभार ग्रामपंचायतीतर्फे मान्यवरांचे मानले गेले.


