शाळकरी चिमुकल्यांना तुडूंब भरलेला ओढा करावा लागतोय पार – पुलाच्या अभावामुळे पालक व मुलांचे हाल
मंगेश पवार
राजगड :-तालुक्यातील मेटपिलावरे (जोरकरवाडी) येथील शाळकरी चिमुकल्यांचे हाल सुरूच आहेत. गावापासून केवळ २ किमी अंतरावर असलेल्या जोरकरवाडीतून शाळेत जाणाऱ्या ५ मुलांना तुडूंब भरलेल्या ओढ्यातून रोज जीव मुठीत घेवून शाळेत जावे लागत आहे.
या ओढ्यावर पुल नसल्याने पालक मुलांना हात धरून किंवा साखळी करून ओढा पार करून देत आहेत. पावसाळ्यात रूद्र रूप धारण केलेल्या या ओढ्यातून प्रवास करताना मुलांच्या जीविताला सतत धोका निर्माण होत आहे.
राजगड तालुक्यातील मेटपिलावरे (जोरकरवाडी) येथील शाळकरी मुले-मुली आजही शिक्षणासाठी प्रचंड संघर्ष करत आहेत. शासनाच्या अनेक योजना राबवल्या जात असल्या तरी त्याचा लाभ या गावापर्यंत पोहोचलेला नाही.
आजच्या काळात “मुली शिकल्या तर प्रगती झाली” असे बोलले जाते. मात्र हाच वास्तव येथे वेगळ्या स्वरूपात दिसतो. जोरकरवाडीतील मुलींना आणि मुलांना शिक्षण घेण्यासाठी रोज तुडुंब भरलेले ओढे पार करावे लागतात, जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागते.
ग्रामस्थांची खंत अशी की – शिक्षणासाठी संघर्ष करण्याची वेळ आजही आपल्या मुले आणि मुलींवर का यावी?
जोरकरवाडीत महादेव कोळी समाजातील नागरिक वास्तव्य करतात. बहुतेक नागरिक अशिक्षित असूनही “आपण शिकलो नाही पण आपली मुलं शिकली पाहीजे” या निर्धाराने ते जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी धाडस करत आहेत. मात्र, शासनाच्या अनेक योजना येथे पोहचल्या नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
“आम्ही शिकलो नाही पण आमची मुलं शिकली पाहीजे यासाठी आम्ही दररोज या ओढ्यातून मुलांना शाळेत सोडवत असतो.”अशोक सांगळे, पालक
“येथील शाळकरी मुले व त्यांचे पालक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू शकते. शासनाने तात्काळ लक्ष घालून पुल बांधावा.” गोरक्ष भुरूक, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श.प. वेल्हे
प्रश्न अनुत्तरीत : जोरकरवाडीत पुलाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नागरिक विचारत आहेत की – “जर कोणती दुर्घटना घडली, तर जबाबदार कोण?”


