न्हावी शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रॅक सूटचे वाटप
दि. 25 सारोळे:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, न्हावी येथे विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा क्षण घडला. शाळेतील तब्बल 100 विद्यार्थ्यांना ट्रॅक सूटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम कै. पंडित रामदत्त एवं शारदा राणी मैत्रेय यांच्या स्मरणार्थ मा. संतरंजन शर्मा व सौ. निधी शर्मा यांच्या दातृत्वातून, नवज्योत परिवार ट्रस्ट चे अध्यक्ष संजय लगाडे व कार्याध्यक्ष मंगेश वांजळे यांच्या सहकार्याने तसेच अनिल चाचर यांच्या विशेष प्रयत्नातून राबविण्यात आला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना मा. संतरंजन शर्मा यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच आवश्यक सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी ते सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री, क्रीडा साहित्य यासाठी सहकार्य करण्याचा विश्वासही व्यक्त केला.
नवज्योत परिवार ट्रस्टचे कार्याध्यक्ष मंगेश वांजळे यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे व शाळेतील शिक्षकांच्या मेहनतीचे मनःपूर्वक कौतुक केले. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणात मागे न राहता स्पर्धात्मक क्षेत्रात पुढे जाता यावे, यासाठी ट्रस्ट अशा उपक्रमांतून नेहमीच योगदान देत राहील, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास अभिजीत सोनवणे, अमोल शिवणकर, राहुल चव्हाण, भानुदास चव्हाण, अशोक सोनवणे, जयदीप चव्हाण, दिलीप भोईटे, मारुती शिंदे, मारुती वंजारी, सोमनाथ उंदरे, सोनाली सोनवणे, सविता गव्हाणे, सोनाली उंदरे, रेखा मानगिरे यांसह ग्रामस्थ व अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक रूपाली पिसाळ यांनी केले, सूत्रसंचलन सौ. पुनम सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन सोनाली बोन्द्रे यांनी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षणासोबत क्रीडा व शारीरिक विकासासाठी प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला आहे.


