भोर तालुक्याच्या गोड प्रवासाला नवी चालना – राजगड कारखान्यास 646.76 कोटींचा दिलासा
भोर (प्रतिनिधी) –भोर तालुक्यातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगम (नवी दिल्ली) यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनामार्फत भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखाना लि. अंततनगर, निगडे या कारखान्यास मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
या कारखान्याच्या दैनंदिन 3500 मेट्रिक टन गाळप क्षमतेच्या प्रकल्प उभारणीसाठी, 60 के.एन.पी.डी. डिस्टिलरी प्रकल्प, 22 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प तसेच 5 टन सी.एन.जी. गॅस प्रकल्प उभारणीसाठी एकूण ₹646.76 कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या निर्णयामुळे कारखान्याचे बळकटीकरणाबरोबरच शेतकरी, कामगार आणि परिसरातील लोकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.
हा महत्वाचा निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट पुढाकार असून, त्याचबरोबर भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे फलित म्हणून हा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयामुळे कारखान्याचे कार्य अधिक सक्षम होऊन शेतकऱ्यांचे उसाचे पैसे वेळेत मिळण्यास मदत होणार आहे. तसेच नव्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना आणि परिसरातील जनतेला आर्थिक उन्नतीच्या नवीन दाराही उघडणार आहेत.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांचे सर्व समाजबंधू, शेतकरी, कामगार व कारखाना परिसरातील नागरिकांतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून, शेतकरी व कामगार वर्गाने हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे मत व्यक्त केले आहे.


