संविधान जागर अभियान अंतर्गत सन्मान
पुणे प्रतिनिधी | एस. एन. नांदेडकर
महाराष्ट्रात संविधान जागर अभियान अंतर्गत संविधान अभ्यासक मार्गदर्शक शिक्षक म्हणून संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर सर यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिक्षणाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची जपणूक व जागृती करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
यावेळी आज का आनंद व संध्यानंदचे संपादक श्याम अग्रवाल तसेच “भारतीय संविधान आणि लोकशाही” या पुस्तकाचे लेखक प्रा. डॉ. जयसिंह, सुनिता सुभाष ओहोळ, सुरेश राजपुरे सर, समीर थोरात सर, प्रा. काकासाहेब लकारे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या सन्मानपत्रात महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रिया व बहुजनांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून सर्वांना समान शिक्षणाचा हक्क दिला, याचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. त्या आदर्शांच्या आधारे विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केल्याबद्दल एस. एन. नांदेडकर सरांचा गौरव करण्यात आला.
संविधान जागर अभियानाच्या वतीने डॉ. नितीन राऊत व तुषार गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निमंत्रक समितीत न्याय बी. जी. कोळसे पाटील, डॉ. राम पुनियानी, न्या. ए. एम. ठिपसे, न्या. टी. व्ही. नलावडे, धनाजी गुरव, नीरज जैन आदी मान्यवरांचा सहभाग असून कार्यक्रमासाठी सुरेश तान्हुबाई बाबुराव राजपुरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या सन्मानामुळे नांदेडकर सरांच्या कार्याला अधिक बळ मिळणार असून, संविधान जागरूकतेसाठी त्यांच्या योगदानाची नोंद समाजात विशेषत्वाने घेण्यात येत आहे.


