महाराष्ट्रभर महापुरुषांच्या विचारांचा जागर; प्रशांत पवित्रे यांची निशुल्क प्रबोधन मोहीम
पुणे प्रतिनिधी | एस. एन. नांदेडकर
महाराष्ट्रभर महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी युवा व्याख्याते प्रशांत पवित्रे यांनी निशुल्क प्रबोधन मोहिम हाती घेतली आहे. “आपणास जे जे कळे इतरांशी सांगूनी शहाणे करून सोडावे सकळ जनास” या संतवचनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील खेडोपाडी तसेच शहरी भागात साजऱ्या होणाऱ्या जन्मोत्सवांच्या पार्श्वभूमीवर तरुणाईपर्यंत महापुरुषांचा खरा इतिहास आणि विचार पोहोचविण्याचा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष, भारताविषयीचे प्रेम आणि त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत देशाला दिलेली लोकशाही व्यवस्था यावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ही मोहीम एखाद्या जिल्हा किंवा तालुक्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येणार असल्याचे प्रशांत पवित्रे यांनी सांगितले. विविध सामाजिक चळवळीतील पदाधिकारी, विचारवंत तसेच बहुजन समाजातील तरुणांनी या प्रबोधनात्मक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.जयंती उत्सवांदरम्यान डीजे, डॉल्बी किंवा रॅली यांसारख्या कार्यक्रमांसोबतच समाजपरिवर्तन आणि एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, प्रशांत पवित्रे यांचे व्याख्यान पूर्णतः निशुल्क असून महाराष्ट्रभर महापुरुषांचे विचार पोहोचविण्याचे कार्य ते करत आहेत. इच्छुकांनी कार्यक्रमासाठी पुढील क्रमांकावर ७६२०५०१०४४ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


