“कुलदीप कोंडे यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट; स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी ‘धनुष्यबाण’ घराघरात नेण्याचा निर्धार”
मंगेश पवार
दि.१९ भोर–राजगड–मुळशी तालुक्याचे शिवसेना नेते मा. कुलदीप कोंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील व दूरदर्शी नेतृत्व, मा. मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांची भेट घेतली.
या भेटीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाली आणि स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांत ताकतीने लढा, धनुष्यबाण घराघरांत पोचवा आणि शिवसेना जनमानसात रुजवा” अशा स्पष्ट सूचना दिल्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. वेळ पडल्यास युती, अन्यथा सर्वच जागा स्वबळावर लढवण्याची भूमिकाही चर्चेतून समोर आली.
भोर पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. तसेच सारोळा–वीर रस्ता, नसरापूर–वेल्हा रस्ता यांसह विविध विकासकामांवरही चर्चा झाली. या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देत कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले. येणाऱ्या अधिवेशनात या कामांसाठी निधी वर्ग केला जाईल, अशी खात्रीही त्यांनी दिली.
या भेटीत शिवसैनिकांनी आपल्या भावना आणि अपेक्षाही व्यक्त केल्या.
“आम्ही आश्वासन देत नाही; प्रत्यक्षात काम करतो. आमचे नेते कुलदीप तात्या कोंडे सक्षम असून पूर्व भागाचे नेतृत्व करण्याची संधी हर्षद बोबडे सरांच्या गळ्यातील ‘माळ’ ठरेल.”
शिवसैनिक दिलीप तनपुरे
“कामे आणि उमेदवार लोकांच्या मनात नक्कीच उतरणार आहेत. उमेदवार हा पक्षनिष्ठ असावा, आयात नसावा. मी इच्छुक असलो तरी उमेदवारी कोणाला मिळो, मी एकनिष्ठपणे काम करणार.” पेंजळवाडी मा.सरपंच विकास चव्हाण
भोंगवली–कामथडी गणातील ताकदही यावेळी अधोरेखित झाली. शिवसैनिक बाळासाहेब शेडगे व संदिप सोनावणे म्हणाले, “शिवसेना कार्यकर्ते एकनिष्ठपणे मैदानात उतरतील आणि उमेदवार विजयी करतील.”
या संपूर्ण भेटीतून भोर–राजगड–मुळशी भागातील शिवसेनेची आगामी निवडणुकांसाठीची तयारी, संघटनाची मजबुती आणि विकासकामांवरील बांधिलकी स्पष्ट दिसून आली.


