“निकाल हरवला, विश्वास जिंकला… अपक्ष बाठे–सोनवणे यांची संघर्षमय लढत”


मंगेश पवार

भोर तालुक्यातील भोंगवली–कामथडी जिल्हा परिषद गट आणि भोंगवली पंचायत समिती गण येथील निवडणूक निकालाने अनेकांची मने सुन्न केली. शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या लढतीत अपक्ष उमेदवार चंद्रकांत बाठे आणि अक्षय सोनवणे यांना अवघ्या काही मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. हा निकाल केवळ आकड्यांचा नव्हता, तर तो असंख्य समर्थकांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरणारा ठरला.

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत आघाडी कधी इकडे तर कधी तिकडे जात होती. आशा आणि निराशेचा खेळ सुरू होता. मतमोजणी केंद्राबाहेर सकाळपासून कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. प्रत्येक फेरीचा निकाल समजताच कधी आनंदाचे जल्लोष, तर कधी चिंतेची शांतता अनुभवायला मिळाली. शेवटचा आकडा जाहीर होताच वातावरण क्षणात बदलले. काहींच्या डोळ्यांत अश्रू तर अनेक जण शांतपणे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहिले.

दोन्ही उमेदवार अपक्ष असूनही गोरगरीब, सर्वसामान्य मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणात साथ दिली. जिल्हा परिषद गटात चंद्रकांत बाठे यांना दोन नंबरची मते, तर पंचायत समिती गणात अक्षय सोनवणे यांना देखील दोन नंबरची मते मिळाली. अपक्ष उमेदवारांना मिळालेला हा जनसमर्थनाचा कौल अनेकांना विचार करायला लावणारा आहे.

ADVERTISEMENT

प्रचारादरम्यान बाठे आणि सोनवणे यांनी घराघरात जाऊन संवाद साधला. महिलांशी थेट चर्चा करत पाणी, रस्ते, शिक्षण, रोजगार, विकास आणि दैनंदिन अडचणी ऐकून घेतल्या. “सत्तेपेक्षा माणूस महत्त्वाचा” आणि ” कामाचा माणूस” हा विचार घेऊन त्यांनी प्रचार केला. त्यामुळेच त्यांच्या पाठीशी मोठा जनसमूह उभा राहिला होता.

या गटात दोन्ही बाजूंनी अत्यंत चुरशीची आणि सन्मानजनक लढत झाली. मतदान शांततेत पार पडले. मतमोजणीदरम्यान प्रत्येक फेरीत काट्याची टक्कर दिसून आली. अखेरीस अवघ्या काही मतांनी निकाल फिरला आणि अपक्ष उमेदवारांचा पराभव झाला.

निकालानंतर समर्थकांनी संयम राखत शांततेत प्रतिक्रिया दिली. अनेकांनी हा पराभव नसून जनतेच्या मनात स्थान मिळाल्याचा विजय असल्याची भावना व्यक्त केली. “आज हरलो असलो, तरी उद्याची लढाई अजून मोठी आहे,” असे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

निसटत्या पराभवामुळे भोंगवली–कामथडी परिसरात भावनिक वातावरण असले, तरी या निकालाने अपक्ष राजकारणाची ताकद दाखवून दिली आहे. भोर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये चंद्रकांत बाठे आणि अक्षय सोनवणे यांच्या लढतीची नोंद दीर्घकाळ घेतली जाईल, यात शंका नाही.

क्रमशः


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!