पराभवानंतरही सेवा सुरूच… ‘आरोग्यदूत’ अक्षय सोनवणे यांनी सत्ता नाही, माणुसकी जिंकली
दि. 13 सारोळे :- निवडणुकीतील पराभव अनेक उमेदवारांसाठी राजकीय शांततेची सुरुवात ठरते. पराभव झाल्यानंतर काही उमेदवार तर पाच वर्षे मतदारसंघाकडे पाठ फिरवतात. मात्र भोर तालुक्यातील भोंगवली पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार तथा ‘आरोग्यदूत’ म्हणून ओळखले जाणारे अक्षय सोनवणे यांनी पराभवानंतरही जनतेशी असलेली नाळ अधिक घट्ट केली आहे.
अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत दोन नंबरची मते घेत सत्तेला कडवी झुंज देणारे अक्षय सोनवणे अवघ्या काही मतांनी पराभूत झाले. मात्र निकालानंतरही त्यांनी समाजसेवेपासून दूर जाण्याऐवजी दुसऱ्याच दिवसापासून मतदारसंघात आरोग्य व सामाजिक कार्य सुरू ठेवले.
या काळात चार गरजू रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया (ऑपरेशन) घडवून आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली, अशी माहिती ऑपरेशन झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. रुग्णालयात दाखल करणे, तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क, उपचार प्रक्रियेत मदत तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना धीर देणे, अशा सर्व बाबींमध्ये अक्षय सोनवणे यांनी सक्रिय सहभाग घेतल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
निवडणूक प्रचारादरम्यान ज्या सर्वसामान्य, गोरगरीब कुटुंबांशी त्यांनी संवाद साधला होता, त्यांच्याच अडचणी सोडवण्यासाठी ते निकालानंतरही तितक्याच तळमळीने कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. “पद नसेल, तरी सेवा थांबत नाही,” हा संदेश त्यांच्या कृतीतून ठळकपणे पुढे येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, पराभवानंतरही मतदारसंघात सक्रिय राहून आरोग्यसेवा, सामाजिक मदत आणि जनसंपर्क सुरू ठेवणारे नेतृत्व दुर्मिळ आहे. त्यामुळेच अक्षय सोनवणे यांना आजही ‘आरोग्यदूत’ म्हणून संबोधले जाते.
आजच्या राजकीय वातावरणात निवडणूक हरल्यानंतर अनेक उमेदवार गायब होतात. मात्र अक्षय सोनवणे यांनी दुसऱ्याच दिवसापासून मतदारसंघात प्रत्यक्ष काम करत वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सत्ता मिळो अथवा न मिळो, समाजासाठी उभे राहणे हेच खरे लोकप्रतिनिधित्व असल्याचे त्यांच्या कार्यातून स्पष्ट होत आहे.
निकालात पराभव झाला असला, तरी जनतेच्या मनात त्यांनी आपले स्थान अधिक घट्ट केले आहे. भोर तालुक्यातील सामाजिक व आरोग्य क्षेत्रात ‘आरोग्यदूत’ अक्षय सोनवणे यांचे कार्य पुढील अधिक व्यापक होईल, अशी अपेक्षा “पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज” तसेच युवावर्ग आणि नागरिक व्यक्त करत आहेत.


