किकवी गावातील पौराणिक महादेव मंदिराचा भव्य कलशारोहण व अभिषेक सोहळा उत्साहात संपन्न


मंगेश पवार

सारोळे :-  “पैसा सर्वांकडे असतो, पण दान करण्याची दानत प्रत्येकाकडे नसते…”

ही म्हण किकवी गावातील पौराणिक महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारातून पुन्हा एकदा सार्थ ठरली आहे. कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीपासून दूर राहून मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार तसेच सुमारे १,००० भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करत शेतकरी बंधू रमेश जाधव यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. मंदिराच्या पुनरुज्जीवनासाठी केलेले हे निस्वार्थ योगदान सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.

 

किकवी येथील पुरातत्त्व काळातील पौराणिक महादेव मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर मंदिराचा कलशारोहण, अभिषेक पूजा व नंदी स्थापना सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. हा पावन सोहळा शुक्रवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता शुभमुहूर्तावर संपन्न झाला.

ADVERTISEMENT

या वेळी गावातील ग्रामस्थ, महिला भजनी मंडळ, तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून येत होता.

शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व आई जोगेश्वरी यांचा अभिषेक व पूजा करण्यात आली. त्याचबरोबर महादेव मंदिरात रुद्राभिषेक संपन्न झाला. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी व महाप्रसादासाठी रमेश जाधव (शेतकरी बंधू – वडगाव पुणे, किकवी, केंजळ) यांनी अन्नदाता म्हणून मोलाची व उल्लेखनीय भूमिका बजावली.

दरम्यान, रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री निमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांसह भाविकांसाठी फराळ वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

या उपक्रमाचे आयोजन भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट किकवी, ग्रामपंचायत किकवी, समस्त ग्रामस्थ मंडळ व महिला भजनी मंडळ किकवी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

या संपूर्ण सोहळ्यामुळे किकवी गावातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला नवसंजीवनी मिळाली असून, ग्रामस्थांमध्ये समाधान, श्रद्धा व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!