श्री छत्रपती शिवाजी विद्यालय किकवी येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न


मंगेश पवार

सारोळे:-  किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी येथे सन 2025–26 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व निरोप समारंभ दि. 14 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संदीप भाऊ बेलदरे (नगरसेवक, पुणे महानगरपालिका, सदस्य स्थायी समिती) उपस्थित होते. यावेळी वकील मा. श्री कावळे साहेब, मा. श्री रामभाऊ लगड, मा. श्री राजाभाऊ पासलकर (उद्योजक, पुणे), किकवी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री प्रशांत कोंढाळकर, सचिव मा. श्री राजेंद्र भोसले, किकवी ग्रामपंचायत माजी उपसरपंच मा. श्री अभिमन्यू कोंढाळकर, सामाजिक कार्यकर्ते मा. श्री अक्षय अहिरे, माजी मुख्याध्यापक मा. श्री उत्तमराव अहिरे तसेच भोर तालुका कबड्डी महासंघ सदस्य मा. श्री संभाजीराव पाटणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

उपस्थित मान्यवरांचे विद्यालयाच्या लेझीम पथकाने पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

ADVERTISEMENT

विद्यालयाच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष  प्रशांत कोंढाळकर व सचिव राजेंद्र भोसले यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे संदीप बेलदरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इतर सर्व मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक श्री विनोद राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक  विनोद राऊत यांनी केले. आपल्या भाषणात प्रमुख पाहुणे संदीप भाऊ बेलदरे यांनी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत परिश्रम, चिकाटी व आत्मविश्वास यांच्या बळावर यश संपादन करण्याचे मार्गदर्शन केले.

इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करून दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांनीही शाळेतील आठवणींना उजाळा देत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत अल्पोपहार देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी शाळेसाठी स्मृतिचिन्ह स्वरूपात भेटवस्तू प्रदान केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मिलिंद मगर यांनी केले, तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक  विनोद राऊत यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!