गाव पातळीवरील पत्रकारांना न्याय देण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा निर्धार  


संपादक दिलीप वाघमारे

राज्यव्यापी दौऱ्यातून संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर – विजय चोरडिया

 

महामंडळ, पेन्शन, घरकुल व अधिस्वीकृती प्रश्नांसाठी ठोस लढा उभारण्याचा इशारा

 

सातारा : गावागावात पत्रकारिता करणारा पत्रकार आज विविध अडचणींच्या विळख्यात अडकलेला आहे. मानधनाचा प्रश्न, अधिस्वीकृतीतील अडथळे, सामाजिक असुरक्षितता, आरोग्य व शिक्षणाच्या सुविधांचा अभाव अशा अनेक समस्यांमुळे ग्रामीण पत्रकार हतबल होताना दिसतो. या पार्श्वभूमीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या राज्यव्यापी दौऱ्याला सातारा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सातारा जिल्हास्तरीय मेळाव्यात बोलताना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, गाव पातळीवरील पत्रकारांचे प्रश्न आता संघटित शक्तीच्या माध्यमातून सोडविले जातील आणि त्यासाठी ठोस व नियोजनबद्ध पावले उचलली जातील.

सातारा येथे आयोजित या पदाधिकारी मेळाव्याला मुख्य उद्देश संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडचणी थेट जाणून घेणे हा होता. विजय चोरडिया यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, ग्रामीण पत्रकार आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, अन्यथा लोकशाहीची मुळेच कमकुवत राहतील. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ कार्यान्वित करणे, अधिस्वीकृतीचा प्रश्न तातडीने निकाली काढणे, पत्रकार पेन्शन योजना सुरू करणे, घरकुल योजना उपलब्ध करून देणे तसेच पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षण आणि आरोग्य सुविधा सुनिश्चित करणे यासाठी संघटना सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. हे प्रश्न केवळ निवेदनांवर न सुटता प्रत्यक्ष अंमलबजावणीतून मार्गी लावले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

राज्यभर सुरू असलेला हा दौरा केवळ बैठका घेण्यासाठी नसून संघटनेची ताकद तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आहे. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवरील पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणे, संघटनात्मक रचना अधिक सक्षम करणे आणि पत्रकारांना एकाच व्यासपीठावर आणणे हा या दौऱ्याचा प्रमुख हेतू आहे. पुढील काळात प्रत्येक जिल्ह्यात संघटनेची कार्यकारिणी अधिक बळकट करणे, महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र उपक्रम राबविणे, युवक पत्रकारांना नेतृत्वाच्या संधी देणे आणि डिजिटल माध्यमातील पत्रकारांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे यावर भर दिला जाणार आहे.

विजय चोरडिया यांनी स्पष्ट केले की, संघटनात्मक मजबुतीशिवाय शासनाला आपली ताकद दाखवता येणार नाही. त्यामुळे पत्रकारांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने पुढे यावे. पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि ठाम लढा उभारण्याची गरज असल्याचा संदेश त्यांनी दिला.

या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख सचिन मोहिते यांनी विभागातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत भविष्यात संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला, तर डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष शेख इर्शाद यांनी डिजिटल युगातील पत्रकारांनी एकत्र राहण्याची आवश्यकता अधोरेखित केली. सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती आणि सक्रिय सहभाग यामुळे हा मेळावा प्रेरणादायी ठरला.

या राज्यव्यापी दौऱ्याच्या माध्यमातून ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा, संघटनेची ताकद वाढविण्याचा आणि पत्रकार समाजात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पत्रकार मजबूत झाला तर लोकशाही मजबूत होते, या विश्वासातून ही चळवळ आता अधिक व्यापक आणि परिणामकारक स्वरूप धारण करीत आहे.

यावेळी सातारा जिल्हाअध्यक्ष अनिल करंदकर, उत्तर विभाग जिल्हा अध्यक्ष समद अत्तार , दक्षिण विभाग जिल्हा अध्यक्ष मोहन बोरकर , कार्याध्यक्ष शिवाजी निकम , जगन्नाथ सोनावले, सचिव सुयोग सोनावणे, राहूल पवार, चंद्रशेखर जाधव , हेमंत धायगुडे, अभिजित शिंगटे, मोहन खुडे, सुधाकर दुंदळे, रामचंद्र ढेबे, शाहरुख बागवान (खटाव), विजय शेळके, सुनिल रासकर, लक्ष्मण शिर्के, संजय भाडळकर, अजित जाधव आणि संदीप माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!