जिल्हा परिषद शाळा खडकीमध्ये होळी उत्साहात साजरी


मंगेश पवार

भोर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खडकी येथे फाल्गुन पौर्णिमेनिमित्त होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला हा सण शिक्षिका सौ. सरिता विजय पाटसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आनंददायी वातावरणात पार पडला.

होळीचा पहिला दिवस होलिका दहनाचा तर दुसरा दिवस धूळवड व रंगपंचमीचा असतो. धुळवडीला शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांनी आजच शाळेत होळी उत्सव साजरा केला. शाळेतील सर्व विद्यार्थी व पालकांनी एकत्र येऊन लाकडे व गोवऱ्या रचून आकर्षक रांगोळी काढत होळी उभारली. होळीला नारळ व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.

यावेळी श्री स्वामी समर्थ व्हॉट्सअॅप ग्रुपचे स्वामी सेवेकरी संतोष कदम व अर्जुन पोटभरे तसेच गावातील पालकांच्या हस्ते होळीची पूजा करण्यात आली. सर्वांनी होळीभोवती प्रदक्षिणा घालत आनंद व्यक्त केला. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. प्रिया रांजणे, सौ. मनीषा रांजणे, रेश्मा रांजणे, अमृता गोहाड व इतर पालक उपस्थित होते.

ADVERTISEMENT

रंगपंचमी खेळताना रसायनयुक्त रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असे आवाहन स्वामी सेवेकरी संतोष कदम यांनी विद्यार्थ्यांना केले.

याचबरोबर श्री स्वामी समर्थ व्हॉट्सअॅप ग्रुपच्या वतीने जिल्हा परिषद शाळा खडकी व उंबरे येथे ८ मार्च महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून आईला शुभेच्छा व “थँक्स यू” पत्र पोस्टकार्डवर लिहून पोस्टाने पाठवण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या अभिनव उपक्रमाचे जिल्हा परिषद शाळा उंबरेचे मुख्याध्यापक श्री. कमलाकर मोहिते यांनी विशेष कौतुक केले. अशा विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते, असे त्यांनी नमूद केले.

सण, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर मिलाफ घडवत जिल्हा परिषद शाळांनी आदर्श उपक्रम राबविल्याबद्दल पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!