महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा; विद्यार्थ्यांनी आईला पाठवली ‘थँक्स यू’ची पत्रे
भोर तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये ८ मार्च महिला दिनानिमित्त एक अनोखा आणि भावनिक उपक्रम राबविण्यात आला. श्री स्वामी समर्थ व्हॉट्सअॅप ग्रुपच्या वतीने जिल्हा परिषद शाळा खडकी, उंबरे, खानापूर, भाबवडी, हातनोशी, रामोशीवाडी, धावडी आणि पळसोशी या शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून आपल्या आईला ‘थँक्स यू’ व महिला दिनाच्या शुभेच्छा देणारी पत्रे लिहिण्याचा उपक्रम घेण्यात आला.
स्वामी सेवेकरी संतोष कदम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महिला दिनाचे खरे महत्त्व समजावून सांगितले. महिलांचा सन्मान म्हणजे नेमकं काय? फक्त एक दिवस महिलांचा सन्मान करायचा का? आपल्या आयुष्यातील आई, ताई, आजी यांना आपण कधी धन्यवाद देतो का? अशा प्रश्नांमधून विद्यार्थ्यांना विचार करायला लावले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आईसाठी मनापासून शुभेच्छा व आभार व्यक्त करणारी पत्रे पोस्टकार्डवर लिहून पोस्टाने पाठवली.
या उपक्रमात जवळपास ८ जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ११० विद्यार्थ्यांनी सुंदर हस्ताक्षरात पत्रे लिहून सहभाग घेतला. या पत्रांपैकी निवडक सुंदर पत्रांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे —
उंबरे शाळा: संस्कृती संदीप खुटवड (इयत्ता ६ वी) – बक्षीस : श्री महेंद्र पिसाळ
भाबवडी शाळा: अभय गाडे (इयत्ता ४ थी) – बक्षीस : श्री अमर बुदगुडे
खानापूर शाळा: अनुष्का अनंता उल्हाळकर – बक्षीस : श्री रमेश बुदगुडे सर
हातनोशी शाळा: श्रीशा गणेश लोहकरे (इयत्ता २ री) – बक्षीस : श्री प्रमोद थोपटे
रामोशीवाडी शाळा: सुर्यकांत गणेश बोडरे (इयत्ता ४ थी) – बक्षीस : श्री अनिलनाना सावले
धावडी शाळा: आदिती राऊत – बक्षीस : श्री मंगेश दरेकर
पळसोशी शाळा: प्रथम क्रमांक – बक्षीस : श्री अतुल किंद्रे
यावेळी जिल्हा परिषद शाळा उंबरेचे मुख्याध्यापक कमलाकर मोहिते व हातनोशीचे मुख्याध्यापक योगेश शिंदे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. अशा वेगवेगळ्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते आणि कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ होतात, असे त्यांनी सांगितले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये महिलांविषयी आदराची भावना निर्माण करणारा ठरला.


