निसरड्या रस्त्यावर अपघात; महिलेची धाडसी मदत
पुणे प्रतिनिधी | एस.एन. नांदेडकर
बिबवेवाडी ते गंगाधाम मार्गावर काल तेल सांडल्याने आणि पावसामुळे रस्ता अत्यंत निसरडा बनला होता. परिणामी, अनेक दुचाकीस्वार घसरून पडत अपघातांची मालिका सुरू झाली. या दुर्घटनांमध्ये काही नागरिकांना किरकोळ दुखापती झाल्या असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अशा गंभीर परिस्थितीत स्थानिक रहिवासी सौ. ऋता देशपांडे यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ मदतीचा हात पुढे केला. त्यांनी जखमींना पाणी व प्राथमिक उपचार देत धीर दिला. एवढेच नव्हे तर, स्वतः एकटीने रस्ता बंद करून पुढील अपघात टाळण्याचा प्रयत्न केला आणि पोलिस येईपर्यंत ठामपणे तिथेच थांबून वाहतूक नियंत्रणात मदत केली.
पावसाळ्यात या मार्गावर वारंवार अशा घटना घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. सदरील वार्तापत्र मनसेचे उदय गडकरी यांनी कळविले आहे.


