दोन दशकांच्या पत्रकारितेनंतर वैभव धाडवे आता समाजसेवेसाठी राजकारणात! पूर्व भागातील कार्यकर्त्यांत उत्साह!


मंगेश पवार

सारोळे : भोर तालुक्यातील सारोळे गावातील युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे वैभव धाडवे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

 

गेल्या दोन दशकांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रश्न मांडत, जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य वैभव धाडवे करत आले आहेत. समाजसेवेची आवड आणि स्थानिक जनतेशी असलेला आत्मीयतेचा संबंध पाहता त्यांनी आता थेट सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

 

वैभव धाडवे यांनी ‘शूरवीर माऊळी संघटने’च्या माध्यमातून अनेक लोकहितार्थ उपक्रम, शिबिरे आणि जनजागृती मोहिमा राबवून ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकी निर्माण केली आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि ग्रामविकास या क्षेत्रात त्यांनी सातत्याने काम केले असून तरुण वर्गात ते आदर्श म्हणून पाहिले जातात.

ADVERTISEMENT

 

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ते भोंगवली-कामथडी गटातून समाजसेवेच्या ध्येयाने मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सारोळे आणि परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे उत्साहाचे वातावरण असून, पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही त्यांच्या स्वागतात आनंद व्यक्त केला आहे.

 

स्थानिक पातळीवर वैभव धाडवे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला भोर तालुक्यात बळकटी मिळेल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

 

 

शूरवीर माऊली संघटनेच्या माध्यमातून वैभव धाडवे यांनी सारोळे आणि परिसरात खऱ्या अर्थाने विकासाची दिशा दिली. गावातील मल्टिनॅशनल कंपनीमध्ये अनेक युवकांना रोजगार मिळवून दिला. रक्तदान शिबिरे, युवक मेळावे आणि सामाजिक उपक्रमांनी तरुणांना एकत्र आणले. नागरिकांना ग्रामविकासाच्या कामात सहभागी करून घेत गावाचा कायापालट केला.समाजसेवेच्या त्यांच्या या निष्ठावान प्रयत्नांमुळे आज सारोळे गाव प्रगतीच्या वाटेवर आहे.

रमेश संपत धाडवे, सामाजिक कार्यकर्ते सारोळे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!