जनतेचा सूर स्पष्ट “रस्ते, हक्क आणि न्यायासाठी लढणाऱ्यांनाच साथ; बाकी सगळ्यांना विश्रांती!


मंगेश पवार

सारोळे :- भोर तालुक्यातील भोंगवली गणात निवडणुकीची चाहूल लागल्याने पुन्हा एकदा जुने चेहरे आणि तेच ते नेते मैदानात उतरले आहेत. काही नेते गावोगावी फिरत “मीच योग्य उमेदवार आहे”असं सांगत भावनिक आवाहन करत आहेत.

 

मात्र गेल्या अनेक वर्षांपासून एकहाती सत्ता असूनही पूर्व भागातील विकास अजूनही अंधारातच आहे.

सारोळा–वीर रस्त्याची अतिदयनीय अवस्था हा आज गणातील सर्वात जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत मुद्दा बनला आहे.

या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक अपघात झाले, अनेक नाहक जीव गेले — तरीही प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून ठोस पाऊल उचलले गेलेले नाही.

स्थानिक नागरिकांनी वारंवार आंदोलनं केली, पण ती केवळ आश्वासनांवरच थांबली.

 

दरम्यान, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्याने अचानक तयार झालेले “कार्यकर्ते” गावोगावी फिरू लागले आहेत, पण त्यांना ना लोकांच्या समस्या ठाऊक आहेत, ना विकासाचं स्पष्ट ध्येय.

ADVERTISEMENT

हे सगळं केवळ राजकीय संधीसाधूपणाचं नाटक आहे, असं जनतेचं मत आहे.

 

जे नेते वर्षभर दिसत नाहीत, ते निवडणुकीच्या वेळी ‘मीच योग्य उमेदवार’ म्हणत गावोगावी फिरतात पण जनतेच्या खऱ्या समस्या विसरतात. खुर्चीला चिटकून बसलेले आणि जनतेपासून तुटलेले हे नेते आता इतिहासजमा होतील.

 

आम्ही रस्त्यावर उतरून लोकांसाठी लढणाऱ्या, समाजाशी जोडलेल्या नव्या कार्यकर्त्यांना संधी देणार आहोत. बदल हाच काळाचा संदेश आहे. आणि हा बदल पुर्व भाग विकास कृती समिती घडवणार आहे.

संतोष बोबडे अध्यक्ष – पुर्व भाग विकास कृती समिती

 

 “प्रहार जनशक्ती पक्ष लवकरच पुर्व भाग विकास कृती समिती सोबत बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट करेल.या बैठकीत स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका, जनतेच्या मागण्यांवर कार्ययोजना आणि विकासाचा मार्गनकाशा निश्चित केला जाईल.भोंगवली गणातील जनतेला आता खऱ्या अर्थाने लोकहितासाठी झटणारा पर्याय देणार आहे.”अजय कांबळे अध्यक्ष – प्रहार जनशक्ती पक्ष भोर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!