१०८ आपत्कालीन सेवेतील डॉ. मंदार माळी यांचा ‘समाजरत्न’ पुरस्काराने गौरव…
सागर खुडे
भोर तालुक्यातील वागजवाडी येथे दिनांक ३१ मार्च रोजी पार पडलेल्या श्री वागजाई व काळूबाई देवीच्या यात्रा उत्सवाचे औचित्य साधून, रुग्णसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ. मंदार सुरेश माळी यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. जिजाई सोशल फाउंडेशन आणि योग पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा गौरव सोहळा पार पडला. डॉ.मंदार माळी हे १०८ आपत्कालीन सेवेत इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. अपघाताचे प्रसंग असोत किंवा इतर गंभीर वैद्यकीय आणीबाणी, अशा परिस्थितीत समाजाप्रती ते असलेली बांधिलकी त्याच्या कार्यतत्परतेतून जपतात,आणि त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची दखल वागजवाडी ग्रामस्थ आणि यात्रा उत्सव कमिटी घेऊन त्यांना छबीन्यायाचे दिवशीच ‘समाजरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या छबिना उत्सवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. माळी यांना सन्मानपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आले.वागजवाडी परिसरात यात्रा उत्सवाचा मोठा उत्साह असताना, केवळ मनोरंजनावर भर न देता समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. डॉ.माळी यांच्या या यशामुळे १०८ आपत्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले असून सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याप्रसंगी जिजाई सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी, योग पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.योगेश जिजाबाई रघुनाथ जाधव, यात्रा कमिटीचे सदस्य आणि वाघाजवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


