घर मिळाले, पण सुविधा नाहीत! आवास योजनेतील स्वप्न अधुरे; रहिवाशांचा संताप शिगेला, तातडीच्या कारवाईची मागणी


पुणे प्रतिनिधी | एस.एन. नांदेडकर

आर्थिक दुर्बल घटकांसाठी घराचे स्वप्न पूर्ण करणारी पंतप्रधान आवास योजना च-होली बु. येथील सप्तगड सोसायटीत मात्र अर्धवट वास्तव ठरत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. डि. वाय. पाटील रोड परिसरातील या सोसायटीत 2023 साली नागरिकांना घरे मिळाली; परंतु आजतागायत मूलभूत सुविधांचा अभाव कायम असून रहिवाशांना रोजच संघर्षमय जीवन जगावे लागत आहे.

पाणीपुरवठ्याचा प्रश्न सर्वाधिक गंभीर बनला असून मार्च महिन्यापासून परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. नळाला पाणी नसल्याने रहिवाशांना स्वतःच्या खिशातून टँकर मागवून पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक भार वाढून सामान्य कुटुंबांची कोंडी होत आहे.

सुरक्षेच्या दृष्टीनेही परिस्थिती धोकादायक बनली आहे. सोसायटीचे मुख्य प्रवेशद्वार अद्याप अपूर्ण असून गेट कोसळून एका व्यक्तीला दुखापत झाल्याची घटना घडूनही प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही. गार्डन, सुरक्षा भिंत यांसारखी मूलभूत कामेही रखडलेली असल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या गंभीर समस्यांबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, सप्तगड सहकारी गृह रचना संस्थेमध्ये बिल्डरकडून अपूर्ण कामे तसेच आवश्यक कागदपत्रांचे हस्तांतरण न झाल्यामुळे रहिवाशांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून अपूर्ण कामे पूर्ण करावीत आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे.

“घर मिळाले ही आनंदाची बाब असली तरी मूलभूत सुविधांशिवाय जगणे कठीण झाले आहे. आमच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा,” अशी संतप्त प्रतिक्रिया गणेश शिलवंत, विजय मुंडे, निता उदागे व सहाणे यांनी व्यक्त केली.
रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!