न्हावी कृषी संस्थेच्या नवीन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा


सारोळे :- भोर तालुक्यातील न्हावी येथील न्हावी कृषी उत्पादक सहकारी संस्था आणि न्हावी कृषी सेवा सहकारी संघ यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आज रविवार (दि. २६ एप्रिल २०२६) रोजी सायंकाळी ६ वाजता न्हावी (स. नं. १५, सारोळा-वीर रोड) येथे होणार आहे. या उद्घाटन समारंभाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते होणार असून उपाध्यक्ष सुनिलजी चांदेरे अध्यक्षस्थानी असणार आहेत. संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक व बँकेचे संचालक भालचंद्रभाऊ जगताप यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड, माजी सदस्य चंद्रकांत बाठे, रणजित शिवतरे, शिवाजी कोंडे, कुलदीप कोंडे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, सहकार निवडणूक आयुक्त बाळासाहेब तावरे, भाजप राज्य परिषद सदस्य बाळासाहेब गरुड, तसेच राजगडचे संचालक दत्तात्रय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ADVERTISEMENT

यावेळी केंद्रीय व राज्य सहकार विकास संस्थांचे अधिकारी तसेच कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे, कृषी विज्ञान केंद्राचे निलेश नलावडे हे आधुनिक शेतीत AI तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन वाढविण्याचे मार्ग यावर मार्गदर्शन करणार आहेत.

संस्थेमार्फत सध्या शेतकऱ्यांना ड्रोनच्या साहाय्याने औषध फवारणीची सुविधा उपलब्ध आहे. त्यासोबतच आता अत्यल्प दरात द्रवखते, कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.

न्हावी कृषी संस्थेचे चेअरमन नवनाथ सोनवणे, उपाध्यक्ष हनुमंत गरुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शिंदे यांनी भोर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!