बिग ब्रेकिंग ! सुरुर येथे इथेनॉलच्या चालत्या टँकरला आग
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरुन वाई तालुक्यातील सुरुर गावच्या हद्दीत शनिवारी दुपारी 4.40 मिनिटांनी चालत्या इथेनॉलच्या टँकरच्या टायरने पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेने महामार्गावर खळबळ उडाली. मात्र, भुईज पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे तत्काळ वाई, पाचगणी, महाबळेश्वर, सातारा आणि किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहचले. इथेनॉलनच्या पेटलेल्या ट्रक विझवण्याचे काम सायंकाळी उशीरापर्यंत सुरु होते. त्यामुळे वाहतुक काही काळ महामार्गावरील थांबवण्यात आली होती.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. या उन्हाच्या तीव्रतेमुळे महामार्गावर दुपारी वाहनांचे प्रमाण कमी असते. याच वेळेस दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर बाजूकडून पुणे बाजूकडे इथेनॉलचा टँकर निघाला होता. या टँकरच्या टायरने सुरुर गावच्या हद्दीत पेट घेतल्याची बाब टँकरमधील चालक व इतरांच्या निदर्शनास आली. त्यांनी लगेच ट्रँकर थांबवला. याची माहिती टँकर चालक व स्थानिकांनी भुईज पोलिसांना दिली. भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे यांना याची माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच पोलीस यंत्रणेला सुचना देत महामार्गावरील काही काळ वाहतुक वळवत पाचगणी नगरपालिका, वाई नगरपालिका, सातारा नगरपालिका, आणि किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. तसेच भुईज पोलीस, वाई पोलीस, खंडाळा पोलीस, सातारा तालुका पोलीस यांनी महामार्गावर दक्षता घेत वाहन धारकांना सुचना केल्या. सायंकाळी उशीरापर्यंत या टँकरची आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु होती. महामार्ग रिकामा केला होता. या घटनेत कुठेही जिवित हानी घडली नाही.
वाढे फाटा येथील घटनेची पुर्नरावृत्ती
दोन वर्षापुर्वी महामार्गावर पुण्याकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या केमीकलच्या गाडीला आग लागली होती. गाडीतून केमीकलचा धुर येत असल्याने त्यावेळी बघ्यांनी गाडीसमोर गर्दी केली होती. मात्र, पोलिसांनी त्यावेळी सतर्कता राखत केमीकलच्या गाडीची आग अग्निशामक दलाच्या सहकार्याने आटोक्यात आणली होती. त्याचीच पूनर्रावत्ती सुरुर गावच्या हद्दीत घडली असून येथे चालत्या टँकरचा टायर पेटला होता.