बिग ब्रेकिंग ! पोहायला गेलेल्या बाप लेकाचा बुडून मृत्यू , वाई तालुक्यातील घटना.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान पोहायला गेलेल्या उत्तम सहदेव ढवळे व मुलगा अभिजित उत्तम ढवळे या बापलेकांचा आसरे ता. वाई येथील पाण्याच्या बोगद्यात दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची फिर्याद वाई पोलीस ठाण्यात झालेली आहे.
वाई पोलीस व घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, आसरे ता. वाई येथून धोम धरणातून खंडाळ्याला जाण्यासाठी कालवा रुपी बोगदा काढण्यात आलेला आहे. आणि तो प्रचंड खोल असून त्यातून बारमाई वाहते पाणी असते. सोमवारी सायंकाळी ढवळे आपल्या मुला समवेत त्या बोगद्यात पोहायला गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले, रात्रीची वेळ असल्याने त्यांचा शोध घेण्यात अडचणी आल्या. दरम्यान बोगदा अवघड असल्याने सह्याद्री रेस्क्यू टीम महाबळेश्वर, सह्याद्री रेस्क्यू टीम प्रतापगड व शिवसह्याद्री रेस्क्यू टीम वाई या तीनही टीमना पाचारण करण्यात आले होते. शोध मोहीम मंगळवार दि. २ रोजी सकाळी सहा वाजता सुरु करण्यात आली. दुपारी तीन वाजता उत्तम ढवळे (वडिलांचा) मृतदेह शोधण्यात यश आले तर मुलगा अभिजित सायंकाळी सहा वाजता सापडला. दरम्यान शिवसह्याद्री टीम सदस्य शोध मोहीम करीत असताना बोगद्यातील लोखंडी रॉड डोक्याला लागल्याने जखमी झाला. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वाईतील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपास वाई पोलीस करीत आहेत.