वाई भूमी अभिलेख विभागाचा असाही अजब कारभार .
वाई प्रतिनिधी
वाई येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा अजब प्रकार नुकताच समोर आला आहे. चक्क मयत व्यक्तीला जिवन्त करून त्याच्या समोर जमिनीची मोजणी करून मयत व्यक्तीचा जबाब घेऊन त्यावर त्याच्या सह्याही घेतल्या आहेत. येथील मोजणी करणारे अधिकारी लक्ष्मीच्यापुढे सदसदविवेकही गहाण ठेवतात की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.
सर्वसामाण्यांची महसूल दप्तरी होणारी ससेहोलपट कोणालाच नवीन नाही. किरकोळ कामासाठीही दहा दहा हेलपाटे मारायला लावून चिरीमिरी घेवून कामे करणारे सरकारी कर्मचारी सर्रास सर्वत्र पाहायला मिळतात. परंतु चक्क मृत व्यक्तीला जिवन्त करून त्याचे जबाब घेण्याचा अफलातून प्रकार वाई भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केला आहे. चिरीमिरीसाठी वाट्टेल ते करण्याने अशा कर्मचाऱ्यांच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
पांडेवाडी ( ता. वाई ) येथील बाबुराव गेनबा फणसे यांची गट नं. ६९ मध्ये शेतजमीन आहे. त्यांच्या शेजारी अमृता रामचंद्र भोसले यांची गट क्र. ६४ आहे. सदर गटाची मोजणी अमृता भोसले यांनी २०२० मध्ये मागवली. भूमी अभिलेख विभागाच्या वतीने सदर मोजणी २२ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आली. लगतदार म्हणून फणसे यांना या मोजणीचे नोटीसही रीतसर देण्यात आले होते. तर सदर मोजणीच्या हद्दी ७ जानेवारी २०२१ रोजी कायम करण्यात आल्या.
विशेष म्हणजे यातील अर्जदार अमृता भोसले हे २० सप्टेंबर २०२० रोजी मयत झाले होते. सदरबाब फणसे यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. मात्र लक्ष्मी पुढे स्वतःची अक्कल गहाण ठेवलेल्या या कर्मचाऱ्यांनी तब्बल १३ महिन्यानंतर मृत व्यक्तीला जिवंत करीत त्यांच्यासमोर मोजणी केल्याचा बनाव केला. एवढ्यावरच हे महाभाग न थांबता मृत भोसले यांचे जबाब स्वतः समक्ष घेऊन त्यावर त्यांच्या साह्याने घेतल्या. हद्दी कायम करण्याच्या वेळीही असेच खोटे जबाब नोंदविण्यात आले. खोटे नकाशे बनवून फणसे यांचे सुमारे १५ फूट क्षेत्रात घुसखोरी करण्यात आल्याचे फणसे यांचे म्हणणे आहे. सदर बाब न्यायप्रविष्ट केल्यानंतर सारवासारव करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने पुन्हा एक मोजणी करून केलेली चूक झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचेही फणसे यांचे म्हणणे आहे.
भूमी अभिलेख विभागाचे विविध कारणामे नेहमीच चर्चेचा विषय असतो. कोणत्याही गोष्टी विहित मुदती न करण्यात हा विभाग कायमच अग्रेसर असतो. येथील एजंट गिरीमुळे सर्वसामान्य अक्षरशः मेटाकुटीला येत असतात. मृत व्यक्तीचे जाबजबाब घेऊन एका व्यक्तीच्या लाभासाठी दुसऱ्याचे नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ काय कारवाई करणार याकडे तालुक्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे.


