वाई येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात .


    सहसंपादक वाई :आशिष चव्हाण 

आज दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी सामाजिक समरसता गतिविधि वाई ‘ च्या वतीने किसनवीर चौक येथे सकाळी ठीक ८ – ०० वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम सामाजिक समरसता गतिविधि संयोजक श्री.सुधीर सूर्यवंशी यांनी भीमवंदना करून उपस्थित बंधू – भगिनींचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तदनंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते निवृत्त न्यायाधीश दिनकरराव कांबळे वयगाव ता.वाई तसेच प्रमुख पाहुणे प्रा.शेखर फरांदे ओझर्डे ता. वाई यांचे हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रतिमा पूजना नंतर वाई शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक संस्थांच्या आणि मंडळांच्या प्रतिनिधींनी महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

रा.स्वं. संघ कार्यवाह श्री.विजयराव जमदाडे यांनी प्रमुख वक्ते व प्रमुख पाहुणे यांचा परिचय करून दिला आणि त्यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच या कार्यक्रमाला दरवर्षी आवर्जून उपस्थित राहणारे आर.पी.आय. चे जिल्हास्तरीय पदाधिकारी श्री.अशोकराव गायकवाड वाई यांचेही श्री.जमदाडे सरांनी पुष्प देऊन स्वागत केले.नंतर प्रमुख वक्ते श्री.दिनकराव कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या मनोगताचा सारांश पुढीलप्रमाणे:

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन हा ज्ञानदिन म्हणून साजरा करावयास हवा. बाबासाहेबांनी आपल्या जीवनभर सामाजिक विषमतेविरुध्द तीव्र संघर्ष केला.

ADVERTISEMENT

जातीअंतासाठी जिवाचे रान केले. इतकेच करून ते थांबले नाहीत तर पुरुष प्रधान संस्कृतीत भरडल्या गेलेल्या स्त्रियांना सामाजिक दास्यातून मुक्त करण्यासाठीही त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. दलित आदिवासींसह समाजातील सर्व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ.बाबासाहेब अखेर पर्यंत आग्रही राहिले.शेतकरी वर्गासाठी सुध्दा त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

सामाजिक समस्या आणि देशाची एकता याबाबत जेव्हा जेव्हा गंभीर तिढा निर्माण झाला तेव्हा तेव्हा देशहितालाच त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याबाबत या महामानवाने कधीच तडजोड केली नाही. अशाप्रकारे त्यांचे राष्ट्रप्रेम जाज्वल्य होते. ते नेहमी सांगत की आपण प्रथम भारतीय आहोत हे कधीही विसरू नका. जात, पंथ, भाषा, प्रांत याबाबत कोणताही भेदभाव मनात न ठेवता एका विचाराने आणि बंधुत्वाच्या भावनेने आपण सर्वांनी राहिले पाहिजे.समरसतेचा भाव प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण झाला तरच आपल्या देशात समता सुखनैव नांदेल.

पण. प्रमुख वक्ते यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर प्रमुख पाहुणे आणि आर.पी.आय. चे पदाधिकारी श्री.अशोकराव गायकवाड यांनीही आपापले मनोगत व्यक्त केले.

श्री.शुभंकर भागवत यांनी बुद्धवंदना म्हटली. त्यानंतर श्री.सचिन पानसे यांनी सामाजिक समरसता प्रतिज्ञा म्हटली त्यात उपस्थितांना सामील करून घेतले.

सामाजिक समरसता गतिविधि जिल्हा सदस्य श्री.सुनील सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि त्यांनीच शेवटी प्रमुख वक्ते, पाहुणे तसेच उपस्थित बंधू – भगिनींचे आभार मानले.

अशा प्रकारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!