किसन वीर’च्या साई केंद्रासाठी होणार मल्लांची निवड चाचणी.


वाई कार्यकारी संपादक: आशिष चव्हाण 

दि. १६/४/२४ : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावरील साई (स्पोर्टस अॅथॉरिटी ऑफ इंडिया) केंद्रातील प्रवेशासाठी मंगळवार व बुधवार (दि.२३ व २४ एप्रिल) सकाळी दहा वाजता कार्यस्थळावरील कुस्ती केंद्रामध्ये मल्ल निवड चाचणी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.

 

किसन वीर साखर कारखान्यावर साईचे अधिकृत केंद्र असून दरवर्षी केंद्र शासनामार्फत निवड झालेल्या मल्लांना मानधन व स्पोर्टस् किटस दिले जाते. यावर्षी ही निवड चाचणी मंगळवार व बुधवारी कारखाना साईटवर होणार असून निवड चाचणीसाठी भारतीय खेल प्राधिकारणाचे संचालक यांच्या देखरेखीखाली मल्लांची निवड होणार असून अनुभवी कुस्ती प्रशिक्षक परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. या चाचणीत निवड झालेल्या मल्लांना किसन वीर कारखान्याच्या साई केंद्रामध्ये शास्त्रीय आणि तंत्रशुध्द मार्गदर्शकाकडून प्रशिक्षित केले जाणार आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची मुले मल्लविद्येमध्ये कुशल होण्यासाठी किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील व संचालक मंडळ संपुर्ण सहकार्य करणार असल्याचेही यावेळी सांगितले.

ADVERTISEMENT

 

कारखाना कार्यक्षेत्रासह जिल्ह्यातील चौदा वर्षाखालील मल्लांसाठी ही निवड होत असून इच्छुक मुलांनी शाळेचा जन्मतारखेचा दाखला, वैद्यकिय दाखला, आधारकार्ड व झेरॉक्स, जिल्हास्तरीय पातळीवरील प्रमाणपत्र, तीन पासपोर्ट साईज फोटो व कुस्तीसाठी लागणारे साहित्य आदी माहितींसह या दिवशी निवड चाचणीसाठी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी कारखाना कुस्ती मार्गदर्शक राजेंद्र कणसे (९२७००७८५३४) यांच्याशी संपर्क साधून कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मुलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही व्यवस्थापनाच्यावतीने प्रमोद शिंदे यांनी केलेले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!