वाई शेती उत्पन्न बाजार समिती मध्ये उत्पन्नाची वाढ.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
वाई शेती उत्पन्न बाजार समिती सन २०२३-२४ मध्ये उत्पन्न एक कोटी ३४ लाख ४३ हजार चारशे रुपये इतके झाले असून वाढावा ५७ लाख ३९ हजार रुपये झाला असल्याची माहिती सभापती श्री मोहन जाधव यांनी पत्रकार परीक्षेत दिली.
आ. मकरंद आबा पाटील यांचे नेतृत्वाखाली बाजार समितीचा कारभार शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने चालू असून चालू वर्षी एक कोटी ३४ लाख ४३ हजार ४०० रुपये उत्पन्न झाले आहे वाढवा ५७ लाख ३९ हजार झाला असून तरतुदी १४ लाखाच्या केल्यानंतर निव्वळ वाढावा ४३ लाख ४१ हजार इतका झाला आहे .
आ.मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील यांचे नेतृत्वाखाली बाजार समितीची निवडणूक होऊन सुमारे ९० टक्के मतदारांनी बाजार समितीची सत्ता पुन्हा आमदार पाटील यांच्या स्वाधीन केली.
मध्यंतरी प्रशासकीय कारर्कीर्दीचे कारभारामध्ये व भाजीपाला मंडईमध्ये विस्कळीतपणा आला होता.
नुतन संचालक मंडळाची सभेत आ.पाटील यांनी सभापतीपदी मोहन जाधव व उपसभापतीपदी विनायक येवले यांची एक मताने निवड केली. तद नंतर नविन पदाधिकारी यांनी सर्व संचालक व कर्मचारी यांना विश्वासात घेऊन वाई तालुक्यातील शेतकरी व कोकणातील व्यापाऱ्यांची तसेच हळद व्यापारी शेतकरी यांच्या स्वतंत्र मीटिंग घेऊन शेतकऱ्यांचे हिताचे व व्यापाऱ्यांच्या सोयीचे निर्णय घेतले. त्यामुळे बाजार समितीमधील आवक वाढून शेतकऱ्यांना चांगले व योग्य दर मिळाले. व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढून बाजार समितीस उत्पन्नही वाढले. त्यामुळेच चालू वर्षी ५७ लाखाच्या पुढे वाढावा मिळाला. चालू वर्षी बाजार समितीने अंतर्गत डांबरीकरण रस्ते, बंदिस्त गटर्स, पूर्वीचे बंद पडलेले स्वच्छतागृह सुस्थितीत आणले.शेतकरी हॉलमध्ये शेतकऱ्यांना उत्तम प्रकारच्या सुविधा दिल्या.
शेतकऱ्यांच्या हळद विक्रीसाठी व त्यांना उत्तम प्रकारचा दर मिळावा म्हणून बाहेरील व्यापाऱ्यांना प्राचारण करून नियमित लिलाव करून उच्चांकी दर मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात हळदीची आवक झालेमुळे वाई बाजार समिती हळदीचे मोठे केंद्र बनले.
उपबाजार आवार पाचवड येथे जनावरांचा बाजार दर मंगळवारी मोठ्या प्रमाणात भरतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जनावरांना योग्य दर मिळाले तर खरेदीदारास चांगली जनावरे मिळाली .तसेच उपबाजार पाचवड येथे सेल हॉल व वेअर हाऊस बांधण्याचा मानस असल्याचे सभापती जाधव यांनी सांगितले.
तसेच वेलंग येथे चालू वर्षी जनावरांचा वार्षिक बाजार कोरोनामुळे व लंपी आजारामुळे विस्कळीत झालेला होता तो वार्षिक बाजार ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात भरवण्यात आला.
सन २००८ पूर्वी बाजार समितीचे अवस्था पूर्णपणे बिकट झाली होती. कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेत मिळत नव्हते. बाजार समिती कर्जबाजारी झाली होती. बाजार समितीमध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांना सुविधा दिल्या जात नव्हत्या. तदनंतर सत्तांतर होऊन आ. पाटील यांचेकडे बाजार समिती आली. श्री मोहन जाधव यांच्याकडे सभापती पदाची धुरा व उपसभापती रवींद्र जाधव त्यावेळीचे सर्व संचालक मंडळ यांनी अथक परिश्रम घेऊन बाजार समिती सुस्थितीत आणली.
यापुढे आम्ही सर्व संचालक मंडळ कर्मचारी मिळून बाजार समितीचा कारभार लोकाभिमुख करण्याचा मनोदय असल्याचे सभापती श्री मोहन जाधव यांनी सांगितले.


