अहिरे झाले तालुक्यातील स्मार्ट ग्राम”! स्व. आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर .
उपसंपादक : दिलीप वाघमारे
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व.आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारासाठी खंडाळा तालुक्यातील अहिरे ग्रामपंचायतीची निवड झाली असून दहा लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रा. पं. विभागाकडून या पुरस्काराबाबत घोषणा झाल्याची माहिती सरपंच मा. रविंद्र सोनवणे यांनी दिली. हा पुरस्कार अहिरे ग्रामपंचायतीने पटकवल्याने अहिरे गावच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. ही पुरस्कार योजना सुरू करून महाराष्ट्र शासनाने स्मार्ट गावांच्या निर्मितीस प्रोत्साहन दिले आहे.
जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून निवड झालेल्या ग्रामपंचायतीस तालुका स्मार्ट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर प्रत्येक तालुक्यातून निवड झालेल्या अकरा ग्रामपंचायतींची स्मार्ट ग्रामसाठी जिल्हा परिषदेच्या तज्ञ पथकाकडून दोन वेळा तपासणी करण्यात आली. सन २०२२-२३ मध्ये तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये निर्धारित निकषांमध्ये खंडाळा तालुक्यामधील अहिरे ग्रामपंचायतीने सर्वाधिक गुण प्राप्त केले.
या पुरस्कारासाठी शासनाच्या निकषाप्रमाणे स्वच्छता,व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा आणि पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर या आधारावर 100 गुणांची ही गुणांकन पद्धती होती. यामध्ये स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शौचालय, पाणी गुणवत्ता तपासणी, शोष खड्डे, जलसंधारण, वृक्ष लागवड, पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य व शिक्षण विषयक सुविधा, केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी, बचत गट, मागासवर्गीय- महिला व बालकल्याण व दिव्यांगावरील खर्च, लेखापरीक्षण पूर्तता, ग्रामपंचायतीचे सर्व अभिलेखांचे संगणकीकरण, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, संगणकीकरणाद्वारे नागरिकांना सेवा पुरविणे, नळ जोडणी,एल.ई.डी.बल्बचा वापर व सौर पथदिवे, धार्मिक व सार्वजनिक इमारतींचे सुशोभीकरण, लसीकरण सत्र नियमितता, वीज बील भरणा, आंतरजातीय विवाह, सुकन्या समृद्धी योजना,अटल पेन्शन योजना, जनधन खाते, कर वसुली, बायोगॅस संयंत्राचा वापर, इत्यादी स्पर्धेसाठीचे निर्धारित निकष पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे करून अंतिम तपासणीतून चांगले गुण मिळाल्यानंतर गावाला हा पुरस्कार जाहीर झाला.
गाव स्वच्छ, सुंदर, उपक्रमशील व सुजलाम सुफलाम व्हावे म्हणून गावचे सरपंच श्री. रविंद्र सोनवणे, उपसरपंच साधना धायगुडे, सदस्य दयानंद धायगुडे, रुपाली जाधव, स्नेहा मोहिते, शिवाजी धायगुडे, प्रवीण चौरे, राणी धायगुडे, शकुंतला धायगुडे, ग्रामसेवक दीपक सोनवणे व ग्रामस्थांनी मेहनत घेतली. यापुढेही गावाच्या विकासासाठी आम्ही सदैव तत्पर असून हा पुरस्कार गावकऱ्यांना समर्पित करत असल्याच्या भावना सरपंच मा
रविंद्र सोनवणे यांनी व्यक्त केल्या.
या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच खासदार नितीन (काका) पाटील, आमदार मकरंद (आबा ) पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष रमेश धायगुडे व युवा उद्योजक नितीन ओहाळ, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) अर्चना वाघमळे व गटविकास अधिकारी अनिल वाघमारे आदींनी अभिनंदन केले.


