अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मोटरसायकल स्वार गंभीर जखमी; किकवी आणि सासवड येथील डॉक्टरांच्या कार्यतत्परतेने युवकाचे वाचले प्राण
नसरापूर प्रतिनिधी : ऐरवी अपघात म्हटला तर रस्त्याने जाणारे नागरीक अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यापेक्षा त्या जखमींचे मोबाईल मध्ये फोटोसेशन करून व चित्रण करून त्या क्लिप, फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात धन्यता मानतात. मात्र जणू देवदूताच्या रूपात आलेल्या पोलीस व डॉक्टर यांनी जखमींचे प्राण वाचवून मनुष्याचा जीव किती महत्वाचा आहे हे पटवून दिले. युवक काही कामानिमित्त
कापूरहोळ ते सासवड महामार्गावरुन जात असताना नारायणपूर हद्दीत अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मोटरसायकल स्वार गंभीर
जखमी झाला.
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, कापूरहोळ ते सासवड महामार्गावरती मोटरसायकल चालक हे आपल्या कामानिमित्त कापूरहोळ वरून सासवडच्या दिशेने चालले होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार राजेश पवार वय 28 वर्ष हे महामार्गावरती पडल्याने गंभीर स्वरूपात जखमी झाले.
महामार्गावरील वाहनांनी ॲम्बुलन्स साठी कॉल लावला असता किकवी तालुका भोर जिल्हा पुणे येथील ॲम्बुलन्स पायलट विशाल कदम यासह आरोग्य दूत डॉक्टर मंदार माळी व सासवड येथील डॉ.ओंकार झिंजुरके आणि पायलट संदीप एरंडकर ॲम्बुलन्स बरोबर अपघात स्थळी दाखल झाले.
दाखल झाल्यानंतर मोटरसायकल चालकाचे प्राथमिक उपचार ॲम्बुलन्स मध्येच आरोग्य दूध डॉक्टर मंदार माळी आणि सासवड येथील डॉक्टरांनी केले. त्यानंतर पुणे येथील ससून हॉस्पिटल येथे ॲम्बुलन्स मध्ये मोटरसायकल चालकाला नेण्यात आले.
तसेच डीएम डॉ प्रियांक जावळे व झेड एम डॉ विठ्ठल बोडके व एडीएम सुजित पाटील यांचं विशेष सहकार्य यावेळी मिळाले.
अपघात स्थळी दोन्ही ॲम्बुलन्स प्राथमिक उपचार करण्यास गेल्याने रुग्णाचे प्राण वाचले. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ.मंदार माळी इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर किकवी व ओंकार झिंजुर्के सासवड यांचे आभार मानले.