महिलांना हक्कांबरोबर कर्तव्याची जाण असणे गरजेचे – प्राचार्य सौ. सुनंदा नेवसे 


[

संपादक : दिलीप वाघमारे

लोणंद: संविधानाने महिलांना सर्व हक्क दिले आहेत. त्यासाठी लढण्याची गरज नाही. स्त्री पुरुष समानता समाजात येणे आवश्यक आहे. ताराबाई शिंदे यांनी समानतेसाठी विचार मांडले आहेत. युनेस्कोने १९७५ मध्ये महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली. महिलांनी मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती ठेवणे आवश्यक आहे. सर्व महिलांनी जागृत होऊन हक्क आणि समानता मिळवली पाहिजे. पुरूषांच्या बरोबरीने महिलांना संपत्तीत अधिकार, कुटुंबामध्ये सन्मानाची आणि समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. पूर्वीपासून स्त्रियांना अज्ञानात ठेवण्यात आले होते. महिलांनी आपले विचार आणि आचरण ही सुंदर ठेवले पाहिजे. आजही महिला व्रतवैकल्य अंधश्रद्धेत अडकलेल्या आहेत. महिलांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आचरण केले पाहिजे. कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या स्त्रियांचा आदर्श प्रत्येक मुलीने व महिलेने ठेवणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन न्यू इंग्लिश स्कूल मुलींचे लोणंदच्या प्राचार्या सौ. सुनंदा नेवसे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचे शरदचंद्र पवार महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजना व अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या वतीने ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले,”महिलांनी कर्तुत्ववान स्त्रियांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी दिलेल्या विचाराचे आचरण करणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श प्रत्येक महिलेने ठेवला पाहिजे. यावेळी व्यासपीठावरती लोणंद येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि महिला तक्रार निवारण समितीचे सदस्य डॉक्टर सौ. स्वाती शहा मॅडम, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य भीमराव काकडे, महिला तक्रार समितीच्या चेअरमन प्रा. सौ. छाया सकटे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एम. डी. नायकू, महिला तक्रार निवारण समितीचे सदस्य प्रा. सुभाष कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

ADVERTISEMENT

महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्य डॉ. सौ. स्वाती शहा मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, प्रत्येक महिलेने स्वतः खंबीर उभे राहिले पाहिजे तसेच महिलांच्या मदतीला धावून जाण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. आर्थिक नियोजन व स्वसंरक्षण स्वतः केले पाहिजे. आधी समाजामध्ये स्त्रियांचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे. प्रत्येक स्त्रीला त्यावर मात करावी लागणार आहे.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थींनींनी भारतातील कर्तुत्वावान स्त्रियांच्या वेशभूषा करून त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला. यातून प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते भित्तिपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील सर्व महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रा. सौ. छाया सकटे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. कु. कोकिळा चांगण यांनी केले. मान्यवरांचे आभार प्रा.पायल घोरपडे यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!