दलित तरुणाच्या हत्याकांडानिषेधार्ध भोर पोलीस स्टेशनला राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी तर्फे निवेदन.
कार्यकारी संपादक: सागर खुडे
भोर : दलित समाजातील तरुणाचा प्रेमप्रकरणातून विवाह केल्यावरून अत्यंत अमानुष रीतीने छळ करून त्याची हत्या करण्यात आली. या हत्येने अवघ्या भोर तालुक्यात खळबळ उडाली. भोर मधील उत्रौली गावातील दलित (बौद्ध) हत्याकांडाची पार्श्वभूमीवर दीड वर्षापूर्वी घडलेल्या नगरमधीलच सोनई दलित हत्याकांडाची आठवण झाली. या हत्याकांडात ज्या प्रकारचे क्रौर्य, अमानुषता, छळवणूक , क्रूरता,दलितद्वेष, जातीयवादी मानसिकता सार्यांनी पाहिली. त्याचीच पुनरावृत्ती झाल्याची घटना भोर येथे घडली.ज्यामुळे फक्त भोर तालुकाच नव्हे तर सर्वत्र समप्रवृत्ती एकच आहे असे दिसते. दलित-सवर्ण यांच्यातील हा अन्याय-अत्याचाराचा संघर्ष सर्वत्र सारखाच आहे. ही घटना घडून दीड महिना उलटला तरी दलित, आदिवासी, मागासवर्गीयांवरील अन्याय-अत्याचार थांबलेले नाहीत. मात्र राज्याचे गृहमंत्री अॅट्रॉसिटीचे गुन्हे कमी होत असल्याचा डांगोरा पिटत आहेत. मुळात देशातील दलित – आदिवासींची सामाजिक सुरक्षाच धोक्यात आली आहे. याला सरकारच जबाबदार आहे. कारण हे अन्याय-अत्याचार रोखण्यास सत्ताधार्यांची राजकीय इच्छाशक्तीच नाही. म्हणूनच कोवळ्या वयाच्या त्या तरुणाला आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यात जितके आरोपी दोषी आहेत, तितकेच, किंबहुना राज्य सरकारही दोषी आहे.
ज्या महाराष्ट्रात महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाजसुधारकांनी सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी आपले आयुष्य वेचले, संपूर्ण देशाने त्यांच्या विचारांचा आदर्श घेतला, त्यांच्या नावाने पुरोगामी महाराष्ट्र अशी ओळख मिळाली, त्याच महाराष्ट्रातील भोर येथील उत्रौली गावात राहणाऱ्या दलित समाजातला तरुण विक्रम दादासाहेब गायकवाड वय वर्ष अंदाजे २७ याची सवर्ण समाजातील मुलीबरोबर प्रेम प्रकरणातून विवाह केल्याच्या कारणावरून मुलीच्या नातेवाईक, समाजबांधव व वेणवडी मधील मुख्य आरोपी अनुज चव्हाण या तरुणाच्या मदतीने त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. विक्रम हा तरुण अतिशय गरीब कुटुंबातील,अत्यंत गरीब परिस्थितीतून कष्ट करून शिक्षण घेत होता.त्याच्या घराचा तोच एक आशेचा किरण.त्याच्या मदतीने कुटुंबात प्रकाश निर्माण झाला असता. अशा विक्रमचा गुन्हा काय,असा सवाल समाजाला पडला आहे.
गुन्हा काय तर सवर्ण समाजातील मुलीबरोबर असलेले त्याचे प्रेमसंबंध आणि त्यातून विवाह एवढच; आणि अशी जातीय तेढ निर्माण करणारी खुज्या विचाराच्या अशा मानसिकतेतूनच विक्रमचा काटा काढण्यात आला. आणि एवढं घडूनही फक्त मुख्य आरोपी अनुज चव्हाण हा एकटाच हजर झाला असूनदेखील प्रशासन या प्रकरणातील सहआरोपींना पकडण्यात अपयशी ठरले,किंवा जाणूनबुजून यांस दुजोरा देत असल्याचं भासत आहे.
याचाच निषेध व्यक्त करीत झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टीचे भोर तालुक्याध्यक्ष सागर यादव यांनी दि.३एप्रिल रोजी भोर पोलीस ठाण्यासमोर घंटानाद आंदोलन पुकारल्याचे निवेदन पत्र दि.२६मार्च२०२५ रोजी पोलिस निरीक्षक भोर यांना सुपुर्द करीत आंदोलन करण्याचा इशारा दिला.
निवेदन पत्र देण्याप्रसंगी राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी भोर तालुकाध्यक्ष सागर यादव यांसह भोर तालुका युवा नेते प्रकाश ओव्हाळ, अक्षय यादव,अक्षय खाटपे, तेजस खोपडे, ओंकार पवार, वैभव गिरे,सुनील जगताप, अक्षय गायकवाड, योगेश गायकवाड,अरुण रणखांबे आदी मंडळी उपस्थित होते.


