भोर-महाड रस्त्यावरील खोदकाम पावसात ठप्प करावे – अपघातांवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी
भोर, ता. ११ जून – भोर-महाड रस्त्यावरील सुदृढीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने चालू असून सद्य परिस्थितीत अनेक ठिकाणी अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे खोदकाम तत्काळ स्थगित करण्याची आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष बापू कुडले यांनी उपविभागीय अधिकारी, भोर यांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, अपूर्ण रस्ते खोदकामामुळे वाहनचालकांना गंभीर धोका निर्माण झाला असून अनेक अपघात घडले आहेत. पावसाळ्यातील धोक्याच्या पार्श्वभूमीवर हे काम त्वरित थांबवावे आणि पुढील आदेश येईपर्यंत सुरु होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनात स्पष्ट केले आहे की, खोदलेल्या ठिकाणी कोणतीही सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे अथवा इशारे नसल्यामुळे वाहनचालक गोंधळून अपघाताच्या गर्तेत सापडत आहेत. तसेच सुस्थितीत असलेला रस्ता अनावश्यकपणे खणू नये, आणि दोन्ही बाजू एकाच वेळी खोदण्याऐवजी एक बाजूचे काम करून वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अपघात घडले, तर संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागातील अधिकारी जबाबदार राहतील, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनाकडे दुर्लक्ष झाल्यास संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
निवेदन देताना अध्यक्ष बापू कुडले,उपाध्यक्ष महेंद्र सोनवणे,संपर्कप्रमुख भानुदास दुधाने, सचिव शांताराम खाटपे,महिला संपर्कप्रमुख राणी शिंदे उपस्थित होते.


