भोर मधील रस्त्यांच्या दुरवस्थेवर तबरेज खान यांचे ठिय्या आंदोलन यशस्वी नगरपरिषदेने घेतली दखल;प्रहार जनशक्ती पक्ष उपाध्यक्ष अजय कांबळे यांचाही या उपोषणाला पाठिंबा
भोर, २३ जून (पुण्यभूमी प्रतिनिधी):
भोर शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि अपूर्ण सिमेंट काँक्रीट कामांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचा आवाज बनत, तबरेज नासिर खान (रा. भेलकेवाडी, भोर) यांनी आज नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन छेडले. या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष अजय कांबळे यांच्यासह भाजप, अजितदादा गट, शिंदे गट, मनसे आणि उबा.ठा. गटाच्या कार्यकर्त्यांचा सक्रिय पाठिंबा मिळाला. परिणामी, नगरपरिषदेला लेखी आश्वासन देत खड्डे बुजवण्याचे आश्वासन द्यावे लागले.
तबरेज खान यांनी याआधी १० जून रोजी रस्त्यांच्या दुरुस्तीची लेखी मागणी केली होती. अनेक वेळा अधिकाऱ्यांना भेटूनही काही ठोस पावले न उचलल्याने, त्यांनी आज सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलन सुरु केले. हे आंदोलन दुपारी २ वाजेपर्यंत शांततेत पार पडले.
आंदोलनादरम्यान नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी थेट चर्चा केली नसली, तरी लेखी आश्वासन देत पुढील पाच ते सात दिवसांत रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, असे नमूद करण्यात आले. काही ठिकाणी दुरुस्तीचे काम तातडीने सुरुही करण्यात आले.
या आंदोलनामुळे शहरातील नागरिकांतून संतप्त भावना व्यक्त झाल्या. “सामान्य माणूस रस्त्यावर उतरल्यावर प्रशासन जागं होतं, मग निवडून दिलेले लोकप्रतिनिधी गप्प का?”, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
तबरेज खान यांनी स्पष्ट केले की, “हे आंदोलन कोणत्याही राजकीय फायद्यासाठी नाही. मी निवडणूक लढवण्यासाठी नव्हे, तर माझ्या शहरातील जनतेसाठी हे पाऊल उचलले आहे.”
या आंदोलनामुळे भोर शहरात जनतेच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे.


