मुलांनी मैदानाकडे वळावे – शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्राचे महत्त्व : किरण साळेकर
पुणे (प्रतिनिधी):- डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे लहान मुले मैदानापासून दूर जात आहेत. याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असून, याबाबत पालक, शाळा आणि समाजाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, असे मत क्रीडा मार्गदर्शक किरण साळेकर सर यांनी व्यक्त केले.
त्यांनी सांगितले की, “मुलांचे आयुष्य केवळ शाळा आणि ट्यूशनपुरते मर्यादित झाले आहे. त्यामुळे त्यांना मैदानावर खेळण्याची सवय राहत नाही. यामुळे मुले मोबाईल गेम्स, सोशल मीडियावर अधिक वेळ घालवतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे.”
गुरुकुल आशा किरण सोशल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून किरण साळेकर सर आणि त्यांच्या टीमने क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. आतापर्यंत ४० ते ५० हजार मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले असून, हजारो मुले विविध क्रीडा प्रशिक्षण घेत आहेत.
शाळांनी मैदानी खेळासाठी योग्य प्रशिक्षक नेमावेत आणि शासनाच्या क्रीडा धोरणाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी समजू शकतात आणि ते या दिशेने मार्गक्रमण करू शकतात.
गुरुकुल संस्थेमार्फत राज्यभरात क्लब, अकॅडमी, शालेय स्पर्धा, स्वसंरक्षण उपक्रम, अन्नदान, वृक्षारोपण आणि सामाजिक सन्मान असे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. विशेष म्हणजे महिलांसाठी प्रशिक्षक म्हणून रोजगाराची संधी देखील निर्माण केली जात आहे.
“मुलांनी मैदानाकडे वळावे, खेळामध्ये रस घ्यावा, कारण खेळ हे केवळ आरोग्यासाठी नव्हे तर एक यशस्वी करिअर बनू शकते,” असा ठाम विश्वास किरण साळेकर सर, अध्यक्ष – गुरुकुल आशा किरण सोशल फाउंडेशन यांनी व्यक्त केला.


