गावडदऱ्यात दोन युवकांकडून घातक शस्त्र जप्त:अपर जिल्हाधिकारी महिलेच्या आदेशाचे उल्लंघन; राजगड पोलिसांकडून अटक
खेड शिवापूर:- गावडदरा (ता. हवेली) येथे घातक शस्त्रासह दोन युवकांना अटक करण्यात आली आहे. दि. 18 जुलै 2025 रोजी रात्री 9.50 वाजण्याच्या सुमारास गावडदरा येथील श्रीरामनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिनकर वावळ यांच्या घरासमोर दोघेजण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून लोखंडी कोयते जप्त केले. सदर आरोपींनी घातक शस्त्र जवळ बाळगून अपर जिल्हाधिकारी पुणे श्रीमती ज्योती कदम यांनी जारी केलेल्या आदेशाचा भंग केला आहे. या आदेशानुसार, 11 जुलै ते 24 जुलै 2025 दरम्यान पुणे ग्रामीण जिल्ह्यात घातक शस्त्र बाळगण्यास सक्त मनाई आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे आदित्य संतोष प्रजापती (वय 20, रा. सिद्धीविनायक सोसायटी, जांबुळवाडी, पुणे) व निवृत्ती रामभाऊ मोहिते (वय 21, रा. अमर चिंधे यांची बिल्डिंग, आंबेगाव खुर्द, पुणे) हे दोघे नोकरी करणारे युवक असून, त्यांच्या ताब्यातून मिळालेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत पोलीस हवालदार अमोल शेडगे ( स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण) यांनी फिर्याद दिली असून, गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे संभाव्य गुन्हा टळल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याचा अधिक तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मेस्त्री करत आहेत.


