राजापूर गावात घरफोडीत ८६,४०० रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास.
दि.20 सारोळे :- राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे राजापूर (ता. भोर) येथे १८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून ते १९ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ८६ हजार ४०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी तुषार वसंत मोरे (वय ४०, व्यवसाय – नोकरी, सध्या रा. गंगोत्री बिल्डिंग, रूम नं. २, एसआरपीएफ ग्रुप नं. १, वानवडी, पुणे, मुळ गाव राजापूर, ता. भोर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात इसमाविरोधात भारतीय दंड विधान कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे राजापूर येथील बंद घराचे कुलूप, कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटातील लॉकरमधून खालीलप्रमाणे ऐवज चोरून नेला –
८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन – किंमत ६४,००० रुपये,
२ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील पुड्या – किंमत ८,००० रुपये,
१ ग्रॅम वजनाची सोन्याची लहान मुलाची जोती – किंमत ८,००० रुपये,
८० ग्रॅम वजनाचे चांदीचे कडे व वाळे – किंमत ६,४०० रुपये.
एकूण चोरीस गेलेला ऐवज अंदाजे ८६,४०० रुपयांचा असून, अज्ञात चोरट्याविरोधात गु.र.नं. २८१/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक २० जुलै रोजी १३.०७ वा. पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून, याप्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा.पो.स.ई. वृषाली देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.वा. माणे करीत आहेत.


