पत्रकारिता क्षेत्रातील सजग, संवेदनशील आवाज हरपला – कै. भुजंगराव (आबासाहेब) दाभाडे यांना शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली.


मंगेश पवार

दि. 22 भोर:-  तालुका पत्रकार संघाचे मा. अध्यक्ष कै. भुजंगराव (आबासाहेब) दाभाडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शोकसभेचे आयोजन मंगळवार, दि. २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता भोर पंचायत समिती सभागृहात करण्यात आले. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कै. आबासाहेब दाभाडे हे केवळ पत्रकार नव्हते, तर एक सामाजिक जाणिवा असलेले संवेदनशील नेतृत्व होते. पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे पत्रकार बांधवांच्या हितासाठी भरीव कार्य केले. भोर तालुक्याच्या अनेक अडचणी, समस्या आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवला. त्यांची पत्रकारिता ही जनतेच्या पाठीशी उभी राहणारी होती.

यावेळी भोरचे प्रांत डॉ. विकास खरात यांनी कै. आबासाहेब दाभाडे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. आबासाहेब दाभाडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या आठवणी जागवत त्यांचे योगदान गौरवले.

ADVERTISEMENT

 

 

या शोकसभेत मा.जि.परिषद सदस्य युवा नेते विक्रम खुटवड यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “आबा हे केवळ पत्रकार नव्हते, तर समाजाभिमुख कार्यकर्ते होते. जनतेच्या भावना ते अचूक ओळखायचे आणि त्या लेखणीच्या माध्यमातून व्यक्त करायचे. प्रशासन, राजकारण आणि समाज यामधील समतोल राखत त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे पार पाडलं. त्यांच्या जाण्याने भोर तालुक्याने एक सजग आणि तळमळीचा आवाज गमावला आहे.”

 

गटविकास अधिकारी किरणकुमार धनवडे यांनी देखील आपल्या मनोगतात सांगितले, “कै.आबासाहेब दाभाडे यांच्याशी माझा पहिल्यांदा संपर्क काही वर्षांपूर्वी आला. त्यांच्यातला आत्मीयता आणि प्रशासनाशी असलेलं सहकार्य हे नेहमीच सकारात्मक होतं. त्यांनी कधीही उधळ स्वरूपाची टीका केली नाही, परंतु योग्य ठिकाणी निर्भीडपणे बोट ठेवायचं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या जाण्याने आम्ही एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावलं आहे.”

 

शोकसभेत इतर पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेकांनी त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी शेअर करत त्यांच्या माणुसकीच्या आणि समर्पित पत्रकारितेच्या आठवणींना उजाळा दिला.

 

कार्यक्रमाचे आयोजन भोर तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एक मिनिट मौन पाळून कै.आबासाहेब दाभाडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

– शोकाकुल, भोर तालुका पत्रकार संघ (रजि.)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!