न्हावी गावात ऐतिहासिक पाऊल – श्री. यमाईमाता मंदिर परिसरात भव्य आठवडे बाजाराची सुरुवात!
मंगेश पवार
दि. 3 सारोळे :- भोर तालुक्याच्या पूर्व भागातील न्हावी गावाने आज एक ऐतिहासिक पाऊल उचलले. न्हावी गावात प्रथमच भव्य आठवडे बाजार सुरु झाला असून, श्री. यमाईमाता मंदिराच्या प्रांगणात याचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

या बाजाराचे उद्घाटन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. भालचंद्रभाऊ जगताप यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी यमाईमातेला श्रीफळ अर्पण करून बाजाराचे विधिवत प्रारंभ करण्यात आला. न्हावी ३२२ चे सरपंच सौ. शितलताई सोनवणे यांचे पती श्री. सुरेशआप्पा सोनवणे, न्हावी १५ चे सरपंच श्री. भरतआण्णा सोनवणे, श्री. पांडुरंग सोनवणे यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
या वेळी प्रमुख उपस्थितीत भोर तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, राजगडचे माजी संचालक रविदादा सोनवणे, वर्तमान संचालक दत्तात्रय चव्हाण, न्हावी विकास सोसायटीचे चेअरमन अंकुशअण्णा सोनवणे, FPO चे चेअरमन नवनाथ सोनवणे, महादेवआप्पा सोनवणे, लव्हादादा चव्हाण, पिंटूनाना सोनवणे, विजय गरुड, संजयदादा चव्हाण, शैलेश जगताप, नागेश नलावडे आदींसह शेकडो शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही दिलासा
न्हावी आणि आसपासच्या पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला विर, वाठार कॉलनी, किकवी, भोर अशा बाजारांमध्ये विक्रीसाठी नेत होते. मात्र, आता स्थानिक बाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांना स्वतःचा ताजा आणि स्वच्छ भाजीपाला विक्रीसाठी योग्य स्थान मिळाले आहे. ग्राहकांनाही आपल्या गावातच शेतमाल उपलब्ध होऊ लागल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी भरणार भव्य बाजार
हा बाजार दर रविवारी भरणार असून, राजापूर, भोंगवली, भांबवडे, पेंजळवाडी, गुणंद, वाठार हिंगे, टापरेवाडी आदी गावांतील शेतकरी व नागरिक याचा लाभ घेणार आहेत.
भविष्यात मंडईसाठी निधी मिळवणार “या आठवडे बाजारामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला चालना मिळेल. भविष्यात राष्ट्रीय सहकार विकास विभाग (NCDC) च्या सहकार्याने या बाजारासाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.”एक पाऊल ग्रामीण स्वावलंबनाकडे…न्हावी गावातील श्री. यमाईमाता मंदिर परिसरात सुरु झालेला आठवडा बाजार हा ग्रामीण स्वयंपूर्णतेचा आणि सहकार तत्वाचा एक उत्तम नमुना ठरणार आहे.भालचंद्रभाऊ जगताप


