गावची झेप डिजिटल युगाकडे — ग्रामपंचायत कापूरहोळ डिजिटल सेवेत अग्रणी
मंगेश पवार
कापूरहोळ भोर, ता. 15 ऑगस्ट —
स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने भोर तालुक्यातील कापूरहोळ ग्रामपंचायत पूर्णपणे डिजिटल करण्यात आली. यापुढे गावातील प्रत्येक घरावर महिलांच्या नावासह क्यूआर कोड (QR Code) असलेली पाटी बसविण्यात येणार असून, नागरिकांना घरबसल्या मिळकतीची माहिती व सर्व व्यवहार ऑनलाइन करता येणार आहेत.
ग्रामविकास अधिकारी संजय वाकळे यांनी सांगितले की, “गावातील सर्व 1001 मिळकतींसाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी मा. गटविकास अधिकारी भोर किरणकुमार धनावडे, मा. उदय जाधव तसेच विस्तार अधिकारी बी.बी. चकाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात आली आहे.”
या उपक्रमासाठी सरपंच मंगलताई गाडे, उपसरपंच रविंद्र (बाबी) गाडे, ग्रामपंचायत सदस्य अजित शेख, रोहित जगताप, प्रज्ञा म्हस्के, सुप्रिया बांदल,शुभांगी धुमाळ, आकाश गाडे आणि लोटस डिजिटल ग्रामसॉफ्ट, सातारा यांचे विशेष सहकार्य लाभले.
या उपक्रमामुळे कापूरहोळ गाव डिजिटल प्रशासनाच्या दिशेने मोठी झेप घेत असून, नागरिकांच्या व्यवहारात पारदर्शकता व वेग वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


