गुजरात सहकार शिष्टमंडळाचा न्हावी विकास सोसायटी व कृषी उत्पादक संस्थेचा अभ्यास दौरा
मंगेश पवार
सारोळे भोर तालुका – सहकार प्रशिक्षण अभ्यास दौऱ्यानिमित्त गुजरात राज्यातील सहकार खात्यामधील शिष्टमंडळाने मौजे न्हावी येथे सदिच्छा भेट देऊन न्हावी विकास सोसायटी व न्हावी कृषी उत्पादक सहकारी संस्था मर्यादित यांचा अभ्यास दौरा केला.
या शिष्टमंडळामध्ये जायमिन पांड्या (कोर्स को-ऑर्डिनेटर – उदयभान सिंगजी रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, गुजरात), जलदीप दिंडोर (डिस्ट्रिक्ट रजिस्टर, गुजरात), करण चौधरी (असिस्टंट डिस्ट्रिक्ट रजिस्टर, गुजरात), हिमालयराज सिंग परमार (असिस्टंट डिस्ट्रिक्ट रजिस्टर, गुजरात) तसेच सहकार खात्यामधील ३० ते ३५ जुनिअर अधिकाऱ्यांचा सहभाग होता.
दौर्यादरम्यान न्हावी विकास सोसायटीचे कर्जवाटप धोरण, न्हावी FPO चे औषध फवारणी ड्रोन प्रकल्प, होऊ घातलेले AI तंत्रज्ञान, खते, औषधे व बी-बियाणे विक्री केंद्र, कांदा प्रक्रिया उद्योग, मंडी इत्यादी कृषीपूरक व्यवसायांची सविस्तर माहिती टीमला देण्यात आली.
या कार्यक्रमाला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, न्हावी विकास सोसायटीचे चेअरमन अंकुश चव्हाण, व्हा. चेअरमन दत्तात्रय सोनवणे, न्हावी कृषी उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन नवनाथ सोनवणे, व्हा. चेअरमन हनुमंत गरुड, तसेच संचालक मंडळातील राजेंद्र सोनवणे, सत्यजित जगताप, सुनिल सोनवणे, लव्हादादा चव्हाण, बाबुराव पवार, रामदास सोनवणे, अवधूत सोनवणे, गुलाब मुलाणी, उल्हास कांबळे, राजेंद्र गांगुर्डे, बाळासाहेब सोनवणे, रमेश सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे भोर तालुका विशेष वसुली अधिकारी विनोदजी काकडे, विकास अधिकारी सचिन जेधे व शाखेतील कर्मचारी यांची उपस्थिती लक्षणीय होती. शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
स्वागत व प्रास्ताविक FPO चे CEO अजित शिंदे यांनी करत FPO मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. न्हावी विकास सोसायटीचे सचिव संतोष सोनवणे यांनी सोसायटीच्या कामकाजावर प्रकाश टाकला.
भालचंद्र जगताप यांनी मार्गदर्शन करताना बँकेच्या कर्जयोजना, FPO उपक्रम व भविष्यातील दिशा स्पष्ट केली. विशेषत: बारामती KVK येथे आयोजित कृषी अभ्यास दौऱ्यात उसाच्या एकरी १०० टनापर्यंत उत्पादनासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करण्याबाबत त्यांनी सांगितले. तसेच लवकरच गुजरातच्या भावनगर व महुआ येथे कृषी अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
न्हावी विकास सोसायटी व न्हावी FPO यांच्या उपक्रमांचे गुजरात शिष्टमंडळाने कौतुक केले व आगामी काळात सहकार व कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवा आदर्श निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला.


