कात्रज–कोंढवा व शिवापूर परिसरातील केमिकलयुक्त प्लास्टिक कचरा शिंदेवाडीत; दूषित हवा पाण्यामुळे नागरिक आजारांना बळी
मंगेश पवार
शिंदेवाडी (भोर )पुण्यातील कोंढवा, कात्रज आणि खेडशिवापूर परिसरातील केमिकलयुक्त प्लास्टिक कचरा स्थानिक नागरिकांकडून हप्ता घेऊन भोर तालुक्यातील शिंदेवाडी गावच्या हद्दीत NHI च्या साडेबारा एकर जागेत हा कचरा टाकला जातोय. या गट नंबर 124 आणि 125 मध्ये बाहेरील नागरिकांनी येऊन अतिक्रमण करून कब्जा केला आहे.
हा कचरा जाळल्यावर निर्माण होणाऱ्या बाष्पीभवनामुळे वातावरण प्रदूषित होत असून स्थानिक नागरिक व युवकांमध्ये श्वसनाचे आजार वाढले आहेत.
दरम्यान, या कचर्यातील रासायनिक घटक पाण्यामध्ये मिसळल्याने विहिरी व बोरवेलचे पाणी दूषित झाले आहे. गावकऱ्यांना आजारांना सामोरे जावे लागत असून, दुधासारखे केमिकलयुक्त पाणी स्थानिक बोरवेलमध्ये दिसून येत आहे. या पाण्याचा परिणाम पुढे ओढे व नद्यांमार्फत नीरा नदीत मिसळत आहे. त्यामुळे शिंदेवाडी, वेळू व परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
यामध्ये केवळ प्लास्टिकच नव्हे तर मेडिकल वेस्ट, औषधांचे अवशेष, वापरलेल्या सुई व इतर घातक पदार्थ टाकले जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे परिसरात विविध प्रकारचे संसर्गजन्य आणि घातक आजार उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गावातील सरपंच रोहिणी गोगावले, सदस्य शारदा ज्ञानेश्वर शिंदे,मारुती गोगावले, सोसायटीचे दत्तात्रेय रामचंद्र शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते,माजी सरपंच मयूर गोगावले, ग्रामसेवक नवनाथ झोळ, एडवोकेट यशवंत दादा शिंदे, युवा सेना भोर प्रमुख अनिकेत शिंदे व तलाठी सतीश काशीद यांनी या गंभीर प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.
पुण्यातील कचरा आमच्या शिंदेवाडी गावात टाकला जातोय.यामुळे हवा व पाणी दोन्ही प्रदूषित होऊन गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पुण्यातील लोक गावाकडे ताजी हवा खायला येतात, पण आमच्यासाठीच हवा–पाणी विषारी झाले आहे.शासन व प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा कचरा थांबवावा, अन्यथा गावकरी आंदोलनाचा मार्ग अवलंबतील.
ज्ञानेश्वर शिंदे, नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे जिल्हा संघटक.