२० दिवसांपासून कोतवालांचे आंदोलन सुरू — शासनाचे कानावर अजूनही पडले नाही का? शिव प्रहार प्रतिष्ठानचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल!
मंगेश पवार
भोर : गावोगावी २४ तास सेवा देणारे महसूल सेवक (कोतवाल) यांना शासनाकडून अद्याप चतुर्थ श्रेणी दर्जा मिळालेला नाही.ब्रिटिशकालीन पद असलेले कोतवाल निवडणुकीपासून नैसर्गिक आपत्तीपर्यंत आणि महसुली वसुलीपासून ई-पिक नोंदणीपर्यंत प्रत्येक जबाबदारी पार पाडतात, या न्याय्य मागणीसाठी महसूल सेवक संघटनेचे आंदोलन सलग २० दिवसांपासून सुरू आहे. पण शासनाने अजूनही कानावर हात ठेवलेले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर शिव प्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संतोष ज्ञानोबा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. “कोतवालाशिवाय महसूल विभागाची चाकं फिरत नाहीत, तरीही त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा नाकारणं हे अन्यायकारक आहे. शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा मोठं आंदोलन उभं केलं जाईल,” असा इशारा प्रतिष्ठानने दिला.
या लढ्यात विकास चव्हाण (माजी सरपंच, पेजळवाडी), गणेश साळुंखे (सरपंच, सावरदरे), सचिन आप्पा पवार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
“शिव प्रहार प्रतिष्ठानचा “शासनाला थेट सवाल केला आहे
“ग्रामसेवक, तलाठी, अधिकारी यांना शासकीय दर्जा आहे, मग २४ तास तत्पर असणाऱ्या कोतवालांना न्याय का नाही?”


