आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या होणार :- मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस..!!


संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी. राज्यांत गेल्या काही दिवसांपासून पोलीस विभागात मोठ्या प्रमाणावर बदल्या होणार असल्याची चर्चा तापलेली आहे. गृह खात्याचे प्रभारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या बदल्यांचा आढावा घेतल्याने आता हा विषय फक्त अफवा राहिलेला नसून निर्णयप्रक्रियेत प्रवेशला आहे. अनेक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक, आयुक्त, तसेच आयजी स्तरावरील अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विशेष म्हणजे काही वरिष्ठ अधिकारी या बदल्या निवडणुका किंवा मार्चनंतर व्हाव्यात अशी अपेक्षा बाळगत असले तरी फडणवीस यांनी स्पष्ट सूचित केले आहे की ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, त्यांना निश्चितच बदलीला सामोरे जावे लागेल.

गडचिरोलीला रवाना होण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची यादी बारकाईने तपासली असून काही जणांच्या बदल्या निश्चित असल्याचे समजते. मागील काही महिन्यांपासून पोलीस विभाग वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होता. विशेषतः कॉल सेंटर घोटाळा आणि त्यावर सीबीआयची कारवाई, अशा घटनांनी सरकारलाही पोलीस यंत्रणेतील फेरबदल करण्यास बाध्य केले आहे. सुरुवातीला या प्रकरणावर पडदा टाकला जाईल असे वाटत होते, परंतु दिल्लीतील सीबीआय सूत्रांनी स्पष्ट केले आहे की काही वरिष्ठांवरही कारवाई होऊ शकते. म्हणूनच या बदल्या केवळ प्रशासकीय नसून, शिस्त आणि स्वच्छतेच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

नवी मुंबई व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचा कार्यकाळ संपत आल्याने नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बदलीचीही चर्चा प्रबळ आहे. त्यांच्या जागी सुनील रामानंद यांचे नाव पुढे येत असून त्यांनी यापूर्वी पुण्यात उत्तम कामगिरी बजावली आहे. अमितेश कुमार यांना अप्पर पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वळवले जाऊ शकते. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या जागी मिलिंद भारंबे किंवा निखिल गुप्ता यांची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी अनुप कुमार सिंह आणि विनय कुमार चौबे हे दोन प्रमुख उमेदवार आहेत, परंतु अनुप सिंह यांचे पारडे सध्या जड मानले जाते. राज्य शासन विनय कुमार चौबे यांना पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक वर्ष ठेवण्याचा विचार करीत आहे. दुसरीकडे, मुंबईतील सहपोलीस आयुक्त पातळीवरही बदल्यांचे वारे वाहत आहेत. सत्यनारायण चौधरी, लखमी गौतम, निशीथ मिश्रा आणि एस. जयकुमार या अधिकाऱ्यांचा दोन वर्षांहून अधिक कार्यकाळ झाल्याने त्यांना राज्याच्या इतर भागांत पाठवले जाण्याची शक्यता आहे. कोकण आयजीपदी निशीथ मिश्रा तर लखमी गौतम व सत्यनारायण चौधरी यांना मुंबईबाहेर जाण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

सह पोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे विभागासाठी संदीप कर्णिक व लखमी गौतम इच्छुक असल्याचे ज्ञात आहे, परंतु शारदा राऊत यांचे नावही या पदासाठी सक्षम मानले जात आहे, कारण त्यांनी सीबीआयमध्ये महत्त्वाच्या केसेस हाताळल्या आहेत. इंटरपोलमधून परत येणारे सुवेझ हक किंवा केंद्रातून राज्यात परतलेल्या मनोज शर्मा यांनाही मुंबई पोलीस दलात महत्त्वाची जबाबदारी देण्याची चर्चा आहे.

दरम्यान, नाशिक, कोल्हापूर, नागपूर व अमरावती या रेंजसाठीही फेरबदल निश्चित मानला जात आहे. कोल्हापूर आयजी सुनील फुलारी यांच्या जागी रामनाथ पोकळे यांची ऑर्डर जवळपास निघाली होती, परंतु संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी कोल्हापूरसाठी रस दाखवल्याने प्रक्रिया थांबली आहे. गृह विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालयात बुधवारी रात्रीपर्यंत या बदल्यांवर उच्चस्तरीय चर्चा झाल्याचे समजते.

पोलीस अधीक्षकांमध्येही बदल मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहेत. गडचिरोलीचे एसपी निलोत्पल यांची बदली नाशिकला होऊ शकते. नागपूरचे उपायुक्त लोहित मतानी यांना चंद्रपूर तर भंडार्‍याचे एसपी नुरूल हसन यांना गडचिरोली पाठविण्याची चर्चा आहे. अमरावतीचे विशाल आनंद हेही गडचिरोलीसाठी चर्चेत आहेत. नागपूर ग्रामीण निकेतन कदम किंवा चंद्रपूरचे एसपी मुमक्का सुदर्शन यांच्यासाठी भंडारा व अमरावतीची शक्यता आहे.तर अहमदनगर येथे महेंद्र पंडित यांचे नाव फायनल मानले जात आहे.

त्यासोबतच पुणे ठाणे नवी मुंबई आणि नागपूर येथील बहुसंख्य पोलीस उपायुक्त ही बदलले जाणार आहे.

राजकीय हस्तक्षेप नाही असे वारंवार सांगितले जात असले तरी शेवटच्या क्षणापर्यंत काहीच निश्चित नाही, कारण स्पर्धा ही अत्यंत उच्च पातळीवर आहे. सुनील फुलारी यांची अमरावती आयजी किंवा रामनाथ पोकळे यांची संभाजीनगर आयुक्तपदी वर्णी लागू शकते.

या सर्व बदल्यांमध्ये फडणवीस यांची कार्यशैली स्पष्ट दिसते निर्णय घेताना लोकप्रियता नव्हे तर कार्यकाळ आणि कामगिरी हेच निकष ठेवले जातील. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील पोलीस संरचनेत मोठे उलथापालथीचे चित्र आपण पाहू शकतो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!