केंजळमध्ये अज्ञात वन्यप्राण्याचा हल्ला; ऊसतोड मजुराच्या पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मंगेश पवार
भोर तालुक्यातील केंजळ (ता. भोर) येथे अज्ञात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराच्या पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवार, दि. ७) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
कृष्णा किरण सोनवणे (वय ५, रा. चाळीसगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. फलटण तालुक्यातील साखरवाडी साखर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांचा केंजळ गावातील एका शेतकऱ्याच्या ऊस फडात मुक्काम असून तेथे ते ऊसतोडीचे काम करत होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कृष्णा याला शौचास लागल्याने त्याची आई सरलाबाई सोनवणे हिने त्याला शेजारच्या शेताच्या कडेला बसवले होते. मात्र काही वेळानंतर कृष्णा दिसून न आल्याने ऊसतोड मजुरांनी आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध सुरू केली. यावेळी कृष्णा हा ऊस फडात रक्तबंबाळ व गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.
त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी भोर येथील जिल्हा उपरुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. हा हल्ला बिबट्याने केला की अन्य कोणत्या वन्यप्राण्यामुळे झाला, याचा तपास वनविभागामार्फत सुरू आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
या दुर्दैवी घटनेमुळे ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरातील नागरिकांनी वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.


