श्री स्वामी समर्थ व्हॉट्सॲप ग्रुपच्या वतीने जिल्हा परिषद शाळा शिरवली येथे मतदान जनजागृती कार्यक्रम


मंगेश पवार

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी श्री स्वामी समर्थ व्हॉट्सॲप ग्रुपच्या वतीने जिल्हा परिषद शाळा शिरवली येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी ह.भ.प. राजेंद्र महाराज शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ७ फेब्रुवारी रोजी मतदान आहे. मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कशी वाढेल, याचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान जनजागृती ही काळाची गरज असून निवडणुकीच्या काळात कोणी खोट्या थापा किंवा आमिष दाखविल्यास त्याला भुलू नका,” असा सल्ला दिला.

ADVERTISEMENT

अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे भोर तालुका अध्यक्ष ह.भ.प. श्री दत्तात्रय गिरे महाराज यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “‘माझे मत, माझे भविष्य’ आणि ‘एका मताचे सामर्थ्य’ या संकल्पनांवर आधारित विविध उपक्रम राबवले जात आहेत. गीत-गायन, निबंध, प्रश्नमंजूषा, व्हिडीओ मेकिंग, भित्तीचित्र, घोषवाक्य स्पर्धा तसेच सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदार राजाला जागृत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

यावेळी स्वामी सेवेकरी संतोष कदम यांनी शाळेतील मंत्रिमंडळाची निवड कशी केली जाते, याच्या उदाहरणातून विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत मतदान प्रक्रिया समजावून सांगितली.

“मी मतदार आहे, म्हणून मतदान करून योग्य उमेदवार निवडणे हा केवळ अधिकार नाही, तर ते माझे राष्ट्रीय कर्तव्य व जबाबदारी आहे. यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढून खरी मतदान जनजागृती साध्य होईल,” असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास श्री दामगुडे सर, गुरव सर, श्री चव्हाण तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!