कामथडी–भोंगवली गणात विक्रम खुटवड यांचा दणदणीत विजय
मंगेश पवार
कामथडी–भोंगवली गणामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम खुटवड हे जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष व इतर पक्षांमध्ये मतदान विभागले गेले असतानाही मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. या विजयामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, सामान्य जनतेने सत्तेच्या विरोधात कौल दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या निवडणुकीत विक्रम खुटवड यांना सर्वसामान्य मतदार, शेतकरी, कामगार वर्ग तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठा पाठिंबा लाभला. विशेषतः ग्रामीण भागातील रस्ते प्रश्न, पाणी, वीज, शेतकरी प्रश्न यांसाठी सातत्याने आंदोलन करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुका अध्यक्ष अजय कांबळे यांच्या ठाम पाठिंब्यामुळे विक्रम यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात एकवटला.
याच काळात पूर्व विभाग समिती व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वेळोवेळी करण्यात आलेली आंदोलने, प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात उभा राहिलेला आवाज आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना दिलेले प्राधान्य याचा थेट परिणाम मतदानावर दिसून आला.
या विजयामुळे कामथडी–भोंगवली गणातील विकासाला नवी दिशा मिळेल, तसेच ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा मतदारांमधून व्यक्त होत आहे. विक्रम खुटवड यांच्या या यशात सामान्य मतदारांचा विश्वास, शेतकरी-कामगार वर्गाची साथ आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
“ग्रामीण भागातील रस्ते, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने वेळोवेळी आंदोलन करून जनतेचा आवाज बुलंद केला. त्याचाच परिणाम म्हणून विक्रम खुटवड यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळाला. हा विजय कोणत्याही एका पक्षाचा नसून सामान्य माणसाच्या हक्काचा आणि लोकशाहीच्या ताकदीचा विजय आहे.”
अजय कांबळे, अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, भोर तालुका


