शिंदमध्ये भरला ४१ वर्षांनी दहावीचा वर्ग ! माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला क्रिडा साहित्य भेट
भोर :- शिंद (ता.भोर) येथील श्री वीर बाजीप्रभू विद्यालयाच्या सन १९८४-८५ मधील माजी विद्यार्थ्यांचा नुकताच तब्बल ४१ वर्षांनंतर एकत्र येत आयोजित स्नेह मेळाव्यात पुन्हा एकदा दहावीचा वर्ग भरला होता. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेले क्रिडा साहित्य भेट दिली.
शिंद येथील वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्नेहमेळाव्यास सुरुवात झाली. हलगीच्या तालावर ग्रामदेवताचे दर्शन घेऊन वाजत गाजत शाळेत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी सर्वांनी गुलाबी फेटे परिधान केले होते. शाळेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. वयाची पंचावन्न पुर्ण करुन साठीकडे चाललेल्या माजी विद्यार्थी एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यात सातारा, नीरा येथून आलेल्या माहेरवाशीणींचाही समावेश होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. जून्या आठवणी सांगताना भावूक झालेलेही पाहायला मिळाले. याही वयात त्यांच्यातील उत्साह वाखाणण्याजोगा होता. वर्गात गेल्यावर प्रत्येकाने ओळख सांगत कुटुंबाची माहिती सांगितली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच शंकर माने, प्रमुख पाहुणे माजी सरपंच रामदास भोंडवे, मुख्याध्यापक बिभिषण पवार यांनी मनोगत व्यक्त करत शाळेला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शंकर शिंदे, बाळासाहेब काळे, किसन भालेघरे, अशोक भिलारे, प्रदिप भालेघरे, जयश्री खुटवड, शिक्षक ,विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटण्यात आला. दरम्यान, दिवंगत तत्कालीन शिक्षक, माजी विद्यार्थी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व्हाट्सअप ग्रुप वर कार्यक्रमाचे नियोजन दोन महिन्यांपासून सुरू होते. सुत्रसंचलन माजी विद्यार्थी गणपत दानवले, प्रास्ताविक भानुदास दुधाणे यांनी केले तर शिवदास भोंडवे आभार यांनी मानले.
माजी विद्यार्थी
नंदा सुतार,श्रीकांत माने,सुरेश भालेघरे,भरत साळुंखे, चंद्रकांत चिखले,रमेश मोहिते, भानुदास दुधाणे, जयवंत गायकवाड, शिवदास भोंडवे, सुनील खुटवड, निर्मला गायकवाड, नंदकुमार शितोळे, सखाराम कुमकर, युवराज साळुंखे, विठ्ठल कुमकर, नारायण सोनवणे, विलास दुधाणे, बापू गायकवाड, गणपत दानवले, विमल सोनवणे, गुलाब किवळे


