महाराष्ट्र गौरव सन्मान सोहळ्यात डॉ. मंदार माळी यांचा ‘आयडल ऑफ महाराष्ट्र 2026’ पुरस्काराने गौरव
दिलीप वाघमारे
लोणंद, दि. 10 एप्रिल 2026 : पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव सन्मान सोहळा 2026 कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटन आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यात आरोग्य, समाजसेवा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना श्रीफळ, नारळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी विशेषत्वाने BVG 108 Ambulance Service मध्ये इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले किकवी येथील डॉ. मंदार माळी यांना ‘आयडल ऑफ महाराष्ट्र 2026’ या राज्यस्तरीय ग्रामीण आरोग्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. माळी यांनी 108 ॲम्बुलन्स सेवेत अहोरात्र कार्य करताना अपघात, सर्पदंश, अर्धांगवायू, भुरळ येणे तसेच प्रसूती अशा विविध आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तत्पर सेवा दिली आहे. भोर, राजगड, जेजुरी, लोणंद, सासवड, सातारा आणि पुणे परिसरात त्यांनी सुमारे 650 हून अधिक प्रसूती यशस्वीरित्या पार पाडल्या असून साडेचार हजारांहून अधिक रुग्णांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा देत अनेकांचे प्राण वाचवले आहेत.
लोणंद डिजिटल 24 तास पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेला हा पुरस्कार त्यांच्या ग्रामीण भागातील उल्लेखनीय आरोग्य सेवेसाठी देण्यात आला असून सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.


