कृषिपंप बसविताना विजेचा धक्का; दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू
वेल्हे (प्रतिनिधी) : राजगड तालुक्यातील घेवंडे येथे रविवारी (दि. १२) दुपारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शेतीसाठी कृषिपंप बसवित असताना निव्ही-घेवंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दामाजी भाऊराव गायकवाड (वय ५०) आणि त्यांचे बंधू दत्तात्रेय उर्फ दत्तू भाऊराव गायकवाड (वय ५५) यांना विजेचा जोरदार धक्का बसला.
या धक्क्यामुळे दोघांचा तोल जाऊन ते थेट खोल पाण्यात पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
वेल्हे पोलीस स्टेशनमार्फत हवेली आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. पोलीस अधिकारी अमित देशमुख, राजेंद्र आवदे, शुभम कदम तसेच बचाव पथकाच्या मदतीने सायंकाळी सुमारे ६.३० वाजता दामाजी गायकवाड यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मात्र, अंधार पडल्यामुळे दत्तात्रेय गायकवाड यांचा मृतदेह सापडू शकला नाही. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. सोमवारी (दि. १३) सकाळी पुन्हा शोधकार्य हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या बचावकार्यात तानाजी भोसले, गणेश सपकाळ (पोलीस पाटील), उत्तम पिसाळ, विक्रम बिरामने, संदीप सोलस्कर, संजय चोरघे, समीर जाधव यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
दरम्यान, माजी सरपंच दामाजी गायकवाड यांच्या अकाली निधनामुळे घेवंडे गावासह संपूर्ण राजगड तालुक्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


