घागरीत सागर : लोकशाहीचा अमृतमहोत्सवी प्रवास उलगडणारे पुस्तक” — संदीप राऊत
पुणे प्रतिनीधी | एस.एन.नांदेडकर
भारतीय लोकशाहीच्या ७५ वर्षांच्या प्रवासाचे सखोल, तटस्थ आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण करणारे ‘भारतीय संविधान आणि लोकशाही अमृत महोत्सवी वाटचाल, एक दृष्टीक्षेप’ हे प्रा. डॉ. जयसिंह ओहोळ लिखित पुस्तक सध्या अभ्यासक आणि वाचकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. संशोधनाची खोली आणि सादरीकरणाची नेमकी मांडणी यामुळे हे पुस्तक लोकशाहीचे आरशासारखे प्रतिबिंब दाखवते, अशी प्रतिक्रिया वाचकांकडून व्यक्त होत आहे.
या पुस्तकात भारतीय संविधानाच्या निर्मितीची पार्श्वभूमी ते आजच्या लोकशाही प्रवासातील विविध टप्पे अत्यंत वस्तुनिष्ठपणे मांडण्यात आले आहेत. काँग्रेसच्या आणीबाणीपासून ते सध्याच्या राजकीय व न्यायिक घडामोडींपर्यंतचे वास्तव निर्भीडपणे मांडण्याचे धाडस लेखकाने दाखवले आहे. केवळ ऐतिहासिक आढावा न देता लोकशाहीसमोरील आव्हाने, संकटे आणि त्यावरील उपाययोजनांची सुस्पष्ट मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य ठरते.
बुद्ध, प्लेटो, ऍरिस्टॉटल यांच्यापासून ते जॉन ड्यूई, अब्राहम लिंकन, जॉन स्टुअर्ट मिल, पंडित नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सोप्या भाषेत केलेले विश्लेषण वाचकांना लोकशाही अधिक सखोलपणे समजून घेण्यास मदत करते.
“घागरमध्ये सागर भरण्याची किमया” लेखकाने साध्य केली असून, लोकशाही समजून घेण्यासाठी अनेक पुस्तकांच्या ऐवजी हे एकच पुस्तक पुरेसे ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे. लेखकाची भूमिका कोणत्याही राजकीय विचारसरणीला झुकणारी नसून डॉ. आंबेडकरांच्या “मी प्रथम आणि अंतिमतः भारतीय आहे” या विचाराशी प्रामाणिक राहणारी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
आज लोकशाही मूल्यांपुढे आव्हाने उभी ठाकलेली असताना तिचा प्रवास समजून घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक लोकशाही समर्थक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी आणि वाचकप्रेमी नागरिकांनी हे पुस्तक वाचावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लेखक : प्रा. डॉ. जयसिंह सुनीता सुभाष ओहोळ
प्रकाशक : प्रियदर्शन प्रकाशन, पुणे
भाग : दोन
एकूण पृष्ठे : ४२१
प्रकरणे : १७
किंमत : ₹३००
उपयुक्त : विद्यार्थी, अभ्यासक, स्पर्धा परीक्षार्थी व सर्वसामान्य वाचक


