ब्रेकिंग न्यूज ! जोशीं विहीर येथे कारच्या धडकेत तरुण भारतच्या दोघांचे अपघाती निधन.


 

वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण

तरुण भारत सातारा कार्यालयात कार्यरत असलेले वितरण विभागाचे प्रमुख मंदार रामचंद्र कोल्हटकर(वय 43, रा.कोल्हटकर आळी सातारा), वितरण वसुली तालुका अधिकारी धीरज बाळासो पाटील ( वय 35, रा.सांगली) या दोघांचा अपघाती मृत्यू गुरुवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास वाई तालुक्यातील जोशी विहीर नजीक झाला. दोघे दुचाकीवरून सातारा बाजूकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिली.धडक एवढी भीषण होती की त्यामध्ये दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात रात्री उशिरा झाली आहे.

ADVERTISEMENT

 

सातारा कार्यालयात कार्यरत असलेले वितरण विभागाचे प्रमुख मंदार आणि धीरज हे दोघे वसुलीचे कामानिमित्त गुरुवारी सकाळी वाई तालुक्यात दुचाकी वरून गेले होते. वाई तालुक्यातील वितरण विभागाचे वसुलीचे काम आटोपुन ते आपल्या दुचाकीवरून ऑफिसकडे सातारच्या दिशेने चालले होते. जोशी विहीर येथे त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या चार चाकी कारने जोराची धडक दिली. धडक एवढी भीषण होती की दोघेही डोक्यावर लांब फेकले गेले. स्थानिक नागरिकांनी लगेच त्या दोघांना ही रुग्ण वाहिकेतून सातारा येथे उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

मंदार कोल्हटकर यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई असा परिवार आहे. ते अभिनय क्षेत्रात चांगले काम करत होते. त्यांनी अनेक मालिका, नाटक यामध्ये काम केलेले आहे. त्यांच्या लहान मुलाच्या मुंजीचा कार्यक्रम दोन दिवसावर आलेला होता. नुकताच त्यांचा वाढदिवसही १४ एप्रिलला पार पडला होता. तर धीरज पाटील यांच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. दोघांच्या अपघाती निधनामुळे तरुण भारत परिवारावर शोकाकुल आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!